परभणी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांसह आठ पोलिसांना पदक
By राजन मगरुळकर | Published: April 27, 2023 03:54 PM2023-04-27T15:54:08+5:302023-04-27T15:54:58+5:30
आठ पोलिसांना सन २०२२ या वर्षासाठीचे पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र व पदक जाहीर झाले आहे.
परभणी :पोलिस दलात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्ह्यातील आठ पोलिसांना सन २०२२ या वर्षासाठीचे पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र व पदक जाहीर झाले आहे. यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे यांच्यासह सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी ही घोषणा केली. त्यानुसार राज्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण आठशे जणांचा समावेश असलेली यादी पोलिस दलाने जाहीर केली. यात परभणी जिल्ह्यातील आठ पोलिसांचा समावेश आहे.
या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदक
ज्यामध्ये परभणी ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र श्रीरंग शिरतोडे, नागरी हक्क संरक्षण विभागातील सहायक पोलिस उपनिरीक्षक अब्दुल रियाज अब्दुल जलील, दीपक साबळे, सायबर विभागातील पोलिस हवालदार गणेश कौटकर, पिंपळदरी ठाण्यात कार्यरत असलेले शिवदास धुळगुंडे, कोतवाली ठाण्यात कार्यरत असलेल्या वंदना नाथभाजने, वाहतूक शाखेतील बालाजी कच्छवे, राजू कांबळे यांचा समावेश आहे. या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा परभणी जिल्ह्यातील पोलिसांनीही सन्मान केला.