मुरुंबा परिसरातील साडेतीन हजार कुक्कुट पक्ष्यांना दयामरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:10+5:302021-01-14T04:15:10+5:30
परभणी : तालुक्यातील मुरुंबा परिसरात बर्ड फ्लूने कोंबड्या दगावल्याच्या घटनेनंतर बुधवारी या परिसरातील ३ हजार ४४३ कुक्कुट पक्ष्यांना दयामरण ...
परभणी : तालुक्यातील मुरुंबा परिसरात बर्ड फ्लूने कोंबड्या दगावल्याच्या घटनेनंतर बुधवारी या परिसरातील ३ हजार ४४३ कुक्कुट पक्ष्यांना दयामरण देण्यात आले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिवसभरात ही प्रक्रिया पूर्ण केली.
तालुक्यातील मुरुंबा परिसरातील ८०० कोंबड्या बर्ड फ्लूने मृत्यू पावल्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या भागातील बर्ड फ्लूचा प्रसार इतर भागात होऊ नये, यासाठी उपाययोजना केली. सुरुवातील मुरुंबा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला. त्यानंतर येथील कुक्कुट पक्ष्यांचे कलिंग (नष्ट) करण्याच्या परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी कुक्कुट पक्षी नष्ट करण्याचे आदेश काढले. त्यानुसार प्रादेशिक पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. संजय गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ए.बी. लोणे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजेसाब कल्लेपुरे, डॉ. शिवाजी पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश सावणे, डॉ. पी.आर. पाटील यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील १०० अधिकारी- कर्मचाऱ्यांचे पथक १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता गावात दाखल झाले. मुरुंबा परिसरातील कुक्कुट पक्ष्यांना दयामरण देण्यासाठी १,२६५ किलो खाद्य वापरण्यात आले. त्यानंतर दयामरण दिलेल्या ३ हजार ४४३ कुक्कुट पक्ष्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने २ बाय २ बाय ७ फूट खोल खड्डे करून त्यात या पक्ष्यांचे डिस्पोजेबल करण्यात आले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली.