परभणीत ४०० ग्राहकांचा मीटरमध्ये फेरफार; बिल कमी येण्यासाठी केला जुगाड
By मारोती जुंबडे | Published: September 27, 2022 05:53 PM2022-09-27T17:53:47+5:302022-09-27T17:54:35+5:30
महावितरणच्या पथकाने तब्बल एक हजार मीटरची तपासणी केली
परभणी : अति वीजहानी असलेल्या वीज वाहिन्यांवरील वीजचोरी विरोधात रविवारी राबविलेल्या मोहिमेत परभणी शहर विभागाने १ हजार मीटर तपासणी केली. त्यामध्ये ४०० मीटरमध्ये छेडछाडकरून गतीमंद केल्याचे निदर्शनास आले आहे. या वीजग्राहकांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
मीटर तपासणी मोहिमेत अडथळा आणणाऱ्या अजमेर कॉलनी परिसरातील एका ग्राहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या सांघिक कार्यालयाच्या निर्देशानुसार जास्त वीजहानी असलेल्या वीज वाहिन्यांवरील वीज चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजचोरी, मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले आहेत.
आठवडाभरापासून राबविलेल्या धडक कारवाईत शहरातील दर्गा वीज वाहिनीवरील १ हजार ग्राहकांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४०० वीज ग्राहकांचे मीटर मंद गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरील ग्राहकावर कंपनीच्या नियमाप्रमाणे कार्यवाही करणे सुरू आहे. परभणी शहरातील दर्गा वीजवाहिनीवर ८२.६ टक्के वीज गळती असल्यामुळे सदरील वीज गळती २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दर्गा वीज वाहिनीवर ३१ रोहित्र असून ४ हजार २९० ग्राहक आहेत.
या वाहिनीवरील ग्राहकाचे मीटर तपासणी करण्यासाठी पाच पथके नियुक्त करण्यात आली आहेत. दर्गा वीजवाहिनीवर २५० ॲम्पीअर करंट जात होता. ही मोहीम सुरू झाल्यानंतर २१० ॲम्पीअर पर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे रोहित्र्याचे फ्यूज जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच ग्राहकांच्या विद्युत पुरवठ्याबाबतच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत. या वाहिनीवर ग्राहकांचे मीटर तपासणी व मीटर बदलण्याचे काम सुरू असून, काम करीत असताना अजमेर कॉलनी या ठिकाणी इम्रान खान लियाकत खान या इसमाने मीटर बदलताना शिवीगाळ व धमकी दिल्याचाही प्रकार समोर आला असून, या वीजग्राहकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वीजहानी कमी करण्याच्या दृष्टीने यापुढेही वीजचोरी विरोधात तीव्र माेहीम राबविण्यात येत आहे. वीजचोरांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, प्रसंगी गुन्हा दाखल करू. महावितरण मागेल त्याला वीजपुरवठा देण्यास बांधिल असून, नागरिकांनी अधिकृतरीत्याच वीज वापरावी.
- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, परभणी.