जिनिंगमध्ये लागलेल्या आगीत लाखों रुपयांचा कापुस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 07:15 PM2019-03-22T19:15:42+5:302019-03-22T19:17:39+5:30
कामगारांनी अग्निरोधक यंत्राच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात आली नाही.
गंगाखेड (परभणी ) : परळी रोडवर असलेल्या प्रसाद फायबर्स प्रा.लि. या जिनिंगमध्ये गुरुवारी (दि. २१) सकाळी ९ वाजेच्या सुमारास कापसाच्या गंजीला आग लागली. आगीत लाखों रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे.
शहरापासून जवळच परळी रोडवर असलेल्या प्रसाद फायबर्स प्रा.लि. या जिनिंगमध्ये कापसाच्या गंजी लावण्याचे काम सुरू असतांना गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अचानक कापसाने पेट घेतला. यावेळी जिनिंगमध्ये असलेल्या कामगारांनी अग्निरोधक यंत्राच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात आली नाही.
यानंतर गंगाखेड नगर परिषद, परभणी महानगर पालिकेचे अग्निशमन दल, तसेच शहरातील खाजगी पाण्याच्या टँकरने आगीच्या ठिकाणी धाव घेतली. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली. मात्र आगीत दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. या प्रकरणी अंदाजे ७० ते ७२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार जिनिंग मालक हरीप्रसाद भिकुलाल सोनी रा. शिक्षक कॉलनी, गेवराई जि. बीड यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पो.ना. प्रल्हाद मुंडे हे करत आहेत.