परभणी जिल्हा परिषदेत विद्यार्थी गणवेशाचा कोट्यवधींचा निधी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 05:17 PM2018-01-06T17:17:50+5:302018-01-06T17:18:22+5:30
जिल्ह्यातील ९१ हजार ८७१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून असल्याचे समोर आले आहे़ शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झाला नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
- चंद्रमुनी बलखंडे
परभणी : जिल्ह्यातील ९१ हजार ८७१ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून असल्याचे समोर आले आहे़ शैक्षणिक सत्र संपत आले तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध झाला नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शासनाच्या वतीने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्या अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात़ या अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व दारिद्रय रेषेखालील विद्यार्थी तसेच सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावर्षीपासून गणवेश घेतल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने प्रती गणवेश २०० रुपये या प्रमाणे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर गणवेशाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ यासाठी परभणी जिल्ह्याला ३ कोटी ६७ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता़ शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील, अशी अपेक्षा होती़ परंतु, विद्यार्थ्यांना बँक खाते काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ शिवाय पालक व विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते काढावे लागत आहे.
जिल्ह्यातील ९१ हजार ८७१ पात्र विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३९ हजार विद्यार्थ्यांनीच बँक खाते काढले आहे़ त्यामुळे यातील काही विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम देण्यात आल्याचा दावाही शिक्षण विभागाने केला आहे़ परंतु, अद्यापही ५२ हजार ८७१ विद्यार्थ्यांचे बँक खातेच काढण्यात आले नाहीत़ त्यामुळे हे विद्यार्थी अजूनही गणवेशापासून वंचित आहेत़ शैक्षणिक सत्र संपत आले तरी अद्याप विद्यार्थ्यांना गणवेशच उपलब्ध झाले नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आह़े. दरम्यान, वरिष्ठ कार्यालयाकडून यावर्षीसाठी पालकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास मान्यता दिली आहे़ परंतु, हा निर्णय शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरच घेतला असता तर बहुतांश विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध झाला असता, शैक्षणिक सत्र संपत आल्यानंतर आता या गणवेशाचे करायचे काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होणार आहे़
९१ हजार ८७१ पात्र विद्यार्थी
शिक्षण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, जमाती, दारिद्रय रेषेखालील विद्यार्थी तसेच सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनींना गणवेश देण्यात येतो़ यामध्ये जिल्ह्यामध्ये ९१ हजार ८७१ पात्र विद्यार्थ्यांची संख्या आहे़ गंगाखेड तालुक्यात ११ हजार १९२, जिंतूर १६ हजार ६२६, मानवत ६ हजार ९९७, पालम ६ हजार ५५४, परभणी शहर ६५४, परभणी तालुका १७ हजार १६५, पाथरी ९ हजार ६०९, पूर्णा ९ हजार २२९, सेलू ८ हजार ९७ तर सोनपेठ तालुक्यामध्ये ५ हजार ७४७ पात्र विद्यार्थ्यांची संख्या आहे़ यातील बहुतांश विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत.
३ कोटी ६७ लाखांचा निधी शाळेकडे वर्ग
शासनाच्या वतीने प्रति विद्यार्थी दोन गणवेश देण्यात येतात़ यासाठीचा निधी तालुकानिहाय वितरित करण्यात आला असून, तालुकास्तरावरून प्रत्येक शाळांना वर्ग करण्यात आला आहे़ जिल्ह्यासाठी ३ कोटी ६७ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता़ त्यात गंगाखेड तालुक्याला ४४ लाख ७६ हजार ८०० रुपये, जिंतूर ६६ लाख ५० हजार ८००, मानवत २७ लाख ९८ हजार ८०० रुपये, पालम २६ लाख २१ हजार ६०० रुपये, परभणी शहर २ लाख ६१ हजार ६०० रुपये, परभणी तालुका ६८ लाख ६६ हजार, पाथरी ३८ लाख ४३ हजार ६०० रुपये, पूर्णा ३६ लाख ९१ हजार ६०० रुपये, सेलू ३२ लाख ३८ हजार ८०० रुपये तर सोनपेठ तालुक्यासाठी २२ लाख ९८ हजार ८०० रुपयांच्या निधीचा समावेश आहे़