राख्यांच्या विक्रीतून व्यावसायिकांची लाखोंची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:22 AM2021-08-14T04:22:03+5:302021-08-14T04:22:03+5:30
राखीपौर्णिमा सणानिमित्त राख्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच राखी पौर्णिमेनिमित्त बहिणीकडून विशेष राख्या खरेदी करून त्या ...
राखीपौर्णिमा सणानिमित्त राख्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच राखी पौर्णिमेनिमित्त बहिणीकडून विशेष राख्या खरेदी करून त्या बांधल्या जातात. हिच बाब अनेक व्यावसायिकांनी हेरली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विक्रेत्यांनी मागवल्या आहेत. प्रत्येक विक्रेत्याकडे किमान १० हजारापासून ते ५० हजारपर्यंतचा माल सध्या उपलब्ध आहे. मागील आठ दिवसांपासून शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार, क्रांती चौक, शिवाजी चौक, नानलपेठ, सरकारी दवाखाना मार्ग, बालाजी मंदिर, वसमत रोड, काळीकमान, देशमुख हॉटेल, उघडा महादेव मंदिर परिसर व अन्य छोट्या-मोठ्या दुकानांमध्येही राख्यांची विक्री होत आहे. शहरात जवळपास ४०० ते ५०० राखी विक्रेत्यांनी राखीचे साहित्य मागविले आहे. राखी पौर्णिमा पुढील रविवारी असली तरी बाजारात महिला व युवतींची राखी खरेदी करण्यासाठी सध्या गर्दी होत असल्याचे दिसून येते.
येथून येथे राखीचे साहित्य
मुंबई, अहमदाबाद, कलकत्ता या ठिकाणाहून राखी मोठ्या प्रमाणावर मागविली जाते. मागील वर्षी व यावर्षी राखी पौर्णिमेच्या १५ दिवस आधी बाजारात विविध दुकाने थाटली आहेत. मागील वर्षी व यावर्षी राखीच्या दरामध्ये वाढ झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
असे आहेत राखीचे प्रकार
कुंदन, खडे, कार्टून, लाईट यासह धाग्याच्या राखी तसेच स्पंजच्या राखी उपलब्ध आहेत. किमान ३ रुपयापासून ते ८० रुपयापर्यंत एका राखीचा दर आहे. यामध्ये लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या कार्टूनच्या राखी ५ रुपये ते ६० रुपये, लाईटच्या राखी ३० रुपये ते १२० रुपये याप्रमाणे विक्री होत आहेत.
यंदा महिलांसाठी राखी पौर्णिमेला ओवाळायला लागणारे विशेष ताट उपलब्ध झाले आहे. तसेच लेडीज राखी व जोड राखी हे प्रकारही महिला खरेदी करत आहेत. भाऊ आणि वहिनी या वेगळ्या प्रकारची राखी यंदा विक्रीसाठी आली आहे.
- लक्ष्मण खोतकर, व्यावसायिक.