कमीतकमी पीकविमा मिळावा असा अहवाल करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सरकारच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 05:15 PM2019-07-19T17:15:39+5:302019-07-19T17:17:57+5:30
विमा कंपन्यांनाच होतो आहे पीक विम्याचा अधिक फायदा; धनंजय मुंडे यांचा आरोप
गंगाखेड (परभणी ) : शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या पीक विम्याचा फायदा कंपन्यांनाच अधिक होतो, तसेच शेतकऱ्यांना कमीतकमी पीकविमा मिळावा असा अहवाल करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सरकारच्या सूचना असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केला.
गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मुंडे यांनी गंगाखेड आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठवाड्यामध्ये सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. ही परिस्थिती राज्य शासनाकडे मांडून कोरडवाहू शेतकऱ्यांना ५० हजार रुपये व बागायतदार शेतकऱ्यांना एक लाख रुपये आणि इतर भागातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी आम्ही सभागृहात केली. मात्र या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताशी देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पीक विमा कंपनीच्या विरोधात मोर्चे काढणाऱ्या शिवसेनेला पाच वर्षात या कंपन्या का दिसल्या नाहीत, असा सवाल उपस्थित करीत शेतकऱ्यांच्या मतांसाठी शिवसेना ढोंग करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच शेतकऱ्यांना कमीत कमी पीक विमा मिळावा, अशा पद्धतीने अहवाल तयार करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना सरकारकडून दिल्या जात आहेत, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, श्रीकांत भोसले, लिंबाजीराव देवकते, बबनराव शिंदे आदी उपस्थित होते.