कार्टून दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्ष कारावास
By राजन मगरुळकर | Published: March 12, 2024 04:53 PM2024-03-12T16:53:16+5:302024-03-12T16:53:53+5:30
परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
परभणी : गतीमंद अल्पवयीन मुलीला चॉकलेट व मोबाईलमध्ये कार्टून दाखविण्याचे आमिष दाखवून आरोपीने अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये पूर्णा पोलीस ठाण्यात २९ मे २०२१ मध्ये गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी निकाल दिला. ज्यामध्ये आरोपीस वीस वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी, पूर्णा पोलीस ठाण्यात २९ मे २०२१ ला फिर्यादी यांनी तक्रार दिली होती. ज्यात फिर्यादीची अल्पवयीन भाची ही मतिमंद असल्याचे माहित असून तिला चॉकलेट व मोबाईलमध्ये कार्टून दाखविण्याचे आमिष दाखवून शेख सोहेल शेख अखिल (रा.अली नगर, पूर्णा) याने पिडीतेवर अत्याचार केला. त्यातून पिडीता ही गर्भवती राहिली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केला होता. गुन्ह्यात पिडीता, आरोपी यांची वैद्यकीय तपासणी, डीएनए नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यात आलेले अहवाल, साक्षीदाराचे जवाब, जप्त मुद्देमाल व पिडीतेची साक्ष महत्त्वाची ठरली.
पिडीतेची साक्ष विशेष प्रशिक्षित शिक्षक यांच्यामार्फत घेण्यात आली. त्यानंतर न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. नायर यांच्या न्यायालयात चालला. मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद गिराम यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, सपोनि. बालाजी तोटेवाड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार राजीव दहिफळे, प्रमोद सूर्यवंशी, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.
११ साक्षीदार तपासले
यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस.नायर यांनी आरोपी शेख सोहेल शेख अखिल (२४) यास कलम ३७६ (२) (एन) अन्वये वीस वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास तसेच भादवी कलम ५०६ अन्वये दोन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.