दुचाकीच्या हँडलला लटकवलेली व्यापाऱ्याची अडीच लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:17 PM2019-12-09T18:17:29+5:302019-12-09T18:30:40+5:30
अल्पवयीन मुलाने बुलेटला असलेली बॅग पळविल्याचे सीसीटीव्हीत कैद
गंगाखेड: आडत दुकान उघडण्यासाठी जात असलेल्या व्यापाऱ्याची अडीच लाख रुपयांची बॅग एका अल्पवयीन चोरट्यांने पळविल्याची घटना सोमवारी (दि. ९ ) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. शहरातील मोंढा परिसरात भरदिवसा झालेल्या या चोरीने व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे.
आडत व्यापारी रंगनाथ रामराव जाधव हे सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मोंढा परिसरातील आडत दुकाना उघडण्यासाठी दुचाकीवर ( क्रमांक एम एच २२ ए क्यू ५१५१ ) जात होते. दरम्यान मोंढा कॉर्नरवर एका पान टपरी समोर जाधव यांनी दुचाकी उभी केली. येथे काही परिचितांसोबत जाधव बोलण्यात दंग होते, याचाच फायदा घेत एका अल्पवयीन चोरट्याने दुचाकीच्या हँडलला लावलेली पैशाची बॅग काही क्षणातच लंपास केली. अवघ्या काही क्षणातच बुलेटवरील बॅग लंपास झाल्याने जाधव भांबावून गेले. आरडा ओरडा करून त्यांनी बॅगेचा शोध घेतला. मात्र, चोरटे आणि बॅग आढळून आले नाहीत.
या घटनेबद्दल रंगनाथ जाधव यांनी तातडीने बॅग चोरीस गेल्याची व बॅग पळविणाऱ्या चोरट्यांची माहिती दिली. यानंतर जमादार रंगनाथ देवकर, पोलीस शिपाई एकनाथ आळसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मोंढा कॉर्नरवर असलेल्या एका कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेंव्हा अल्पवयीन मुलाने बुलेटला असलेली बॅग पळविल्याचे दिसून आले. दर सोमवार व शनिवार या आठवडी बाजाराच्या दिवशी किमती मोबाईल, दुचाकी वाहने आदी पळविणाऱ्या चोरट्यांनी आता भरदिवसा मुख्य बाजार पेठेतुन व्यापाऱ्यांची बॅगा लंपास केल्याच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे.