परभणी येथून बेपत्ता झालेला मुलगा ठाण्यात सापडला; पोलिसांनी सुखरूप आणले परत
By ज्ञानेश्वर भाले | Updated: May 9, 2023 16:35 IST2023-05-09T16:32:30+5:302023-05-09T16:35:01+5:30
रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्हीचा फायदा मुलाला परभणी रेल्वे स्थानकावर पाणी व खाद्य विक्री करणाऱ्या विक्रेत्याने पाहिले होते.

परभणी येथून बेपत्ता झालेला मुलगा ठाण्यात सापडला; पोलिसांनी सुखरूप आणले परत
परभणी : बिस्किट पुडा आणि चिवडा आणण्यासाठी घराबाहेर पडलेला अकरा वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी नवा मोंढा ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. अखेर या मुलाला पोलिसांनी परभणी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेऊन मुंबई येथील ठाणे येथून ताब्यात घेतले. त्यानुसार या मुलाला परभणीत आणल्यानंतर त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
मोहम्मद शोयब मोहम्मद अजीज (रा. इकबालनगर) यांनी फिर्याद दिली होती. यामध्ये चार मे रोजी सायंकाळी चार वाजता दादाराव प्लॉट इकबाल नगर परिसरातून घरून उसेद अब्दुल्ला मोहम्मद शोयब (११) हा त्यांचा मुलगा बिस्किट पुडा, चिवडा आणण्यासाठी घराबाहेर पडला. तो परत घरी आला नव्हता. हा मुलगा परभणी रेल्वे स्थानक येथे गुरुवारी सायंकाळी पाहिल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यावरून पोलिसांनी सदरील मुलाचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीची पाहणी केली.
यानुसार हा मुलगा मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसल्याचे समजले. त्यावरून बेपत्ता झालेल्या उसेद अब्दुल्ला मोहम्मद शोयब याचा शोध पोलिसांनी लावला. तो मुंबईत ठाणे परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून नातेवाईकांच्या मदतीने मुलाला ताब्यात घेत शहानिशा केल्यानंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ही मोहीम सहायक पोलिस निरीक्षक वामन बेले, पोलिस कर्मचारी नागनाथ मुंढे, सय्यद जाकीर आली यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
विक्रेत्याने दिली माहिती
याच मुलाला परभणी रेल्वे स्थानकावर पाणी व खाद्य विक्री करणाऱ्या विक्रेत्याने पाहिले होते. त्या मुलाने संबंधिताकडे मुंबईकडे जाणारी रेल्वे कुठे येते, कधी येते, याची विचारणा केली होती. या व्यापारी, विक्रेत्याने सुद्धा पोलिसांना सदरील मुलाबाबत माहिती दिली.