परभणीत एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनास संमिश्र प्रतिसाद; दुपारनंतर काही बस सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 02:44 PM2024-09-03T14:44:37+5:302024-09-03T14:44:57+5:30
सकाळी ११ वाजेनंतर तुरळक प्रमाणात बस सुरू झाल्या असल्या तरी अनेक प्रवाशांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागला.
परभणी : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, यासह इतर मागण्यासाठी एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनातपरभणी विभागातील एसटी कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे अनेक बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या परिणामी प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागला.
शासनाने महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, वार्षिक वेतनवाढीच्या व घरभाडे भत्त्याच्या वाढीव दराची थकबाकी द्यावी, यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी सकाळपासून आंदोलन सुरू केले. आंदोलनात जिल्ह्यातील बसचालक, वाहकांसह कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सकाळपासून अनेक बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. यावेळी परभणी विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी ग्रामीण बस स्थानक, मध्यवर्ती कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलन केले. परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी या आगारातून बस रद्द झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. दरम्यान सकाळी ११ वाजेनंतर तुरळक प्रमाणात बस सुरू झाल्या असल्या तरी अनेक प्रवाशांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागला.
राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र याकडे पाकिस्तानी दुर्लक्ष होत गेले. शासनाने आता तरी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊ मागण्या मान्य कराव्यात.-गोविंद वैद्य, जिल्हाध्यक्ष, एसटी कामगार संघटना