माहिती लपवणे आले अंगलट, आमदार दुर्राणी अन् मुटकुळे यांचे जिल्हा बँकेचे संचालकत्व रद्द
By ज्ञानेश्वर भाले | Published: December 11, 2023 05:31 PM2023-12-11T17:31:37+5:302023-12-11T17:32:50+5:30
दोन्ही आमदारांच्या संबंधित सहकारी संस्थेवर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे लपवले
परभणी : निवडून आलेल्या सहकारी संस्थेकडे जिल्हा बँकेची थकबाकी असल्याने आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकत्व विभागीय सहनिबंधकांनी रद्द केले आहे. यात हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे सुद्धा समावेश असल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक लढताना आमदार दुर्राणी, आमदार मुटकुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यादरम्यान दोन्ही आमदारांच्या संबंधित सहकारी संस्थेवर जिल्हा मध्यवर्ती बँकेची मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. सहकारी संस्थेवर थकबाकी असताना त्यांनी संबंधित माहिती लपवत निवडणुकीच्या आखाड्यात विजयी मिळवला होता. तक्रारीनंतर ही बाब पुढे आल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक विधान परिषदेवरील राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी, हिंगोलीतील भाजपचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांचे संचालकत्व विभागीय सहनिबंधक गुट्टे यांनी रद्द केल्याचा आदेश दिला.
संबंधित दोन्ही आमदारांनी निवडणुकीदरम्यान ते ज्या संस्थेचे प्रतिनिधीत्व करतात ती सहकारी संस्था जिल्हा बँकेची थकबाकीदार असल्याची माहिती लपवल्याची तक्रार बँकेचे माजी संचालक अँड. स्वराजसिंह परिहार यांनी सहकार खात्याकडे केली होती. या प्रकरणी सुनावणी घेत संबंधित दोन्ही आमदारांचे संचालकत्व विभागीय सहनिबंधक जे.बी. गुट्टे यांनी रद्द केल्याचा आदेश पारित केला.