आमदार रत्नाकर गुट्टे कुटुंबीयांच्या मालमत्तेत पाच वर्षांत घट; १२० कोटींवरून ९० कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 18:41 IST2024-10-26T18:40:10+5:302024-10-26T18:41:24+5:30
रत्नाकर गुट्टे यांच्या विवरणपत्रानुसार त्यांच्यावर विविध प्रकारचे आठ ते दहा गुन्हे अथवा खटले आहेत.

आमदार रत्नाकर गुट्टे कुटुंबीयांच्या मालमत्तेत पाच वर्षांत घट; १२० कोटींवरून ९० कोटींवर
परभणी : सध्या अर्ज भरलेल्या उमेदवारांपैकी सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे समोर येत आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे जवळपास ९० कोटींची मालमत्ता आहे. मागच्या वेळी जवळपास १२० कोटी रुपयांची मालमत्ता होती. रत्नाकर गुट्टे यांच्याकडे जंगम मालमत्ता ५८.०४ कोटींची आहे, तर पत्नी सुदामती यांच्याकडे २०.६७ कोटींची आहे. स्थावर मालमत्ता रत्नाकर गुट्टे यांच्याकडे ३.५७ कोटींची, तर सुदामती यांच्याकडे ८.९२ कोटींची आहे. गुट्टे यांच्यावर २०.४५ कोटींचे, तर पत्नीवर ७.०५ कोटींचे कर्ज आहे.
मागच्या निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांनी विवरणपत्रात सादर केल्यानुसार त्यांची जंगम मालमत्ता ८२.०५ कोटी रुपयांची होती. त्यांच्या पत्नी सुदामती यांची मालमत्ता ४९.१८ कोटींची होती, तर स्थावर मालमत्तेत रत्नाकर गुट्टे यांच्याकडे ९.५९ कोटींची, तर पत्नी सुदामती यांच्याकडे ८.१३ कोटींची मालमत्ता होती. तर मागच्या वेळी गुट्टे यांच्यावर १९.३४ कोटींचे, तर सुदामती यांच्यावर १२.२० कोटींचे कर्ज होते. सुदामती यांच्यावरील कर्जही घटले आहे.
गुट्टे कुटुंबाकडे ७३ तोळे सोने
गुट्टे कुटुंबाकडे ७३ तोळे सोने आहे. यामध्ये रत्नाकर गुट्टे यांच्याकडे ३५ तोळे, तर त्यांच्या पत्नी सुदामती यांच्याकडे ३८ तोळे सोने आहे. जवळपास सव्वापाच लाख रकमेचे हे दागिने असल्याचे म्हटले.
आठ ते दहा गुन्हे
रत्नाकर गुट्टे यांच्या विवरणपत्रानुसार त्यांच्यावर विविध प्रकारचे आठ ते दहा गुन्हे अथवा खटले आहेत. यामध्ये बनावट कागदपत्रे बनवून कट करून लोकांची फसवणूक करण्याचा गंगाखेडातील गुन्हा, अंबेजोगाई येथे दाखल आर्थिक अपहाराचे गुन्हे, सोशल डिस्टन्सिंग न पाळता केलेलेल्या आंदोलनाचा परभणीतील गुन्हा, रास्ता रोको, गंगाखेडमध्ये शांतता समितीत पोलिसांविरुद्धच भाषण केल्याने त्यांच्याविषयी अप्रीतीची भावना निर्माण केल्याच्या गुन्ह्याचा समावेश आहे. याशिवाय प्रवर्तन निदेशालय दिल्ली येथे बनावट कागदपत्रे देऊन अपहार प्रकरण यासह अन्य एक बँकेची फसवणूक केल्याच्या प्रकरणाचाही समावेश आहे.