'...तर मी आत्महत्या केली असती', आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वक्तव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 05:02 PM2023-01-02T17:02:34+5:302023-01-02T17:04:10+5:30
रत्नाकर गुट्टे यांनी रासपच्या तिकीटावर तुरुंगातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
गंगाखेड: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून निवडूण आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या एका वक्तव्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे. 'तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला जीवदान मिळालं, नाहीतर मी आत्महत्या केली असती', असं विधान रत्नाकर गुट्टे यांनी केलं आहे. पूर्णा येथे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.
आमदार गुट्टे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला. यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. पण, निवडणुकीपूर्वीच त्यांना तुरुंगवास झाला होता. शेतकऱ्यांच्या नावावरील कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यामुळे 2019ची निवडणूक त्यांनी तुरुंगातूनच लढवली होती. अशा परिस्थितीतही त्यांचा विजय झाला.
त्यावेळेस गुट्टे यांची मनःस्थिती काय होती, त्याबाबत त्यांनी कार्यक्रमात बोलून दाखवले. गुट्टे म्हणाले, ‘तुम्ही सर्व मतदार माझे भाऊ-बहीण कुटुंब आहात. तुमच्यामुळेच मला जीवदान मिळालं. खोटं कधी बोलत नाही, पण निवडणुकीत हरलो असतो तर मला आत्महत्या करावी लागली असती. तुम्ही निवडून दिलं म्हणून मी बोनस जगतोय,' असं वक्तव्य आमदार गुट्टे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याने मतदारसंघात सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
तुरुंगातून विजय खेचून आणला
रत्नाकर गुट्टे गंगाखेड शुगरचे चेअरमन, मोठे उद्योजक तथा रासपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा जामीन नाकारला होता. यानंतर त्यांनी तुरुंगातूनच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचा जवळपास 18 हजार मतांनी पराभव केला आहे.