पूर्ण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांचा मनसेने केला वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 05:34 PM2018-09-06T17:34:38+5:302018-09-06T17:35:42+5:30
पालिका प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खड्डयांचा वाढदिवस साजरा करत निषेध केला.
पूर्णा (परभणी) : शहरात अनेक वर्षांपासून रस्त्यावर खड्डे आहेत. मात्र याकडे पालिका प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खड्डयांचा वाढदिवस साजरा करत निषेध केला.
शहरातील मुख्य भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, कमाल टॉकीज, आनंद नगर ते बसस्टॉप या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तीन वर्षांपूर्वी मनसेकडून याच खड्यात बेशरम झाडाचे रोप लावून आंदोलन केले होते.
यानंतरही रस्त्यातील खड्डे तसेच आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. या बाबत मनसेने अनेक वेळा लेखी निवेदन देऊनही पालिका प्रशासनाने दाखल घेतली नाही. पालिका प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज मनसेने या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर केक कापत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के, शहराध्यक्ष गोविंद ठाकर, सचिन पाटील, अनिल बुचाले, जिल्हाध्यक्ष सुशीला चव्हाण, निशांत कमळू, विष्णु चापके, गजानन चापके, पंकज राठोड, प्रशांत त्रिभुवन आदींची उपस्थिती होती.