परभणी येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:41 AM2017-12-10T00:41:02+5:302017-12-10T00:41:29+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळेतच माझे स्वत:चे शिक्षण झाले आहे़ त्यावेळची परिस्थिती वेगळी होती़ आताची परिस्थिती बदलली आहे़ त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या का घटत आहे, यावर शिक्षकांनी आत्मचिंतन करून शिक्षण पद्धतीत बदल केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले़

Model Teacher Award distribution ceremony at Parbhani | परभणी येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

परभणी येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेच्या शाळेतच माझे स्वत:चे शिक्षण झाले आहे़ त्यावेळची परिस्थिती वेगळी होती़ आताची परिस्थिती बदलली आहे़ त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या का घटत आहे, यावर शिक्षकांनी आत्मचिंतन करून शिक्षण पद्धतीत बदल केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले़
जि़प़ आदर्श शिक्षक पुरस्कारांचे शनिवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध सभागृहात वितरण झाले़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर बोलत होते़ व्यासपीठावर जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते, सभापती श्रीनिवास मुंडे, अशोक काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबराव देसाई, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मणन, प्राचार्य अंभोरे, शिक्षणाधिकारी बी़ आऱ कुंडगीर, आशा गरुड, जि़प़ सदस्य श्रीनिवास जोगदंड, दशरथ सूर्यवंशी, अनिलराव नखाते, गजानन अंबोरे आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जि़प़च्या शाळांना १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ तसेच मानव विकास मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६०० शाळा ई-लर्निंग करण्यासाठी संगणक व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़ शासनाच्या वतीने जि़प़ शाळांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना लोकसहभागातूनही ग्रामस्थांनी आपली जबाबदारी ओळखून स्थानिक प्रश्न सोडवावेत़ माझे स्वत:चे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले असून, त्या काळी शिक्षणाची पद्धत वेगळी होती़ शिक्षकांची मुले स्वत: आमच्यासोबत होती़ आता परिस्थिती बदलली आहे़ शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे़ यावर शिक्षकांनी आत्मचिंतन करणे आवश्यक आहे़ शिवाय शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून आधुनिक शिक्षण पद्धती अवलंबिली पाहिजे़ आपल्या शाळेतील विद्यार्थी नोकरीला लागला यावर समाधान न मानता त्या विद्यार्थ्यांकडे पाहिल्यास आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, असे विद्यार्थी घडवा, असेही त्यांनी आवाहन केले़ यावेळी जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास कटीबद्ध असल्याचे सांगून चट्टोपाध्याय वेतन श्रेणीचा प्रश्न निकाली काढला जाईल, असे आश्वासन दिले़ विद्यार्थी संख्येअभावी राज्यातील जि.प.च्या १३०० शाळा बंद झाल्या़ त्यामुळे शिक्षकांनी यावर विचार करून विद्यार्थी संख्या टिकविण्यासाठी व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले़ शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत़ परंतु, गुणवत्तेकडे शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे़ शिवाय शिक्षकांनी आदर्श बनण्याबरोबरच चारित्र्यसंपन्नही रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ यावेळी अध्यक्षा राठोड, सभापती मुंडे, काकडे आदींनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी ‘ मिशन १०० डेज’ या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले़ पुरस्कार विजेत्या शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केले़
या शिक्षकांना पुरस्कार प्रदान
यावेळी प्राथमिक गटातून व्यंकट जाधव (इटलापूर, जि़प़ शाळा ता़ परभणी), विष्णूपंत पर्डे (खांबेगाव, ता़ पूर्णा), प्रकाश ड्ुब्बे (भोगाव, ता़ जिंतूर), तुकाराम मुंडे (पोखर्णी वा़ ता़ गंगाखेड), शंभूदेव कुंडगीर (मुदखेड, ता़ पालम), सदाशिव धापसे (तीवठाणा ता़ सोनपेठ), दिगंबर लगड (वालूर ता़ सेलू), कान्हू लहिरे (रामपुरी ता़ मानवत) रुख्मिण जाधव (बाबुलतार ता़ पाथरी), माध्यमिकमधून शोभा राजूरकर (एरंडेश्वर ता़ पूर्णा) तर विशेष शिक्षक संवर्गामधून मारोती चव्हाण (पाथरी) या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ तसेच सतीश कांबळे (सातेगाव, ता़ पालम), माधव सोनवणे (धर्मापुरी ता़ परभणी) या शिक्षकांना विशेष प्रोत्साहनपर पुरस्काराने गौरविण्यात आले़ तसेच शिष्यवृत्ती, नवोदय प्रवेश परीक्षा, दहावीतील गुणवंत विद्यार्थी, राज्य व राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू, स्वच्छ विद्यालय, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त जि़प़ शाळा कोळवाडी (ता़ पालम), राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला़

Web Title: Model Teacher Award distribution ceremony at Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.