सोमवार ठरला आंदोलन वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:25+5:302021-06-22T04:13:25+5:30

परभणी : विविध सामाजिक संघटना, प्रशासनातील कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रखडलेल्या प्रश्नांवर तब्बल चार महिन्यांनंतर सोमवारी आवाज उठविण्यात आला. ...

Monday was an agitation | सोमवार ठरला आंदोलन वार

सोमवार ठरला आंदोलन वार

Next

परभणी : विविध सामाजिक संघटना, प्रशासनातील कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रखडलेल्या प्रश्नांवर तब्बल चार महिन्यांनंतर सोमवारी आवाज उठविण्यात आला. एकाच दिवशी पाच विविध आंदोलने झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गजबजला होता.

कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प होते. दोन आठवड्यांपूर्वी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि एकेक व्यवहार सुरू पूर्व झाले. या दरम्यान मागील चार महिन्यांपासून रखडलेल्या प्रश्नांवर आंदोलकांनी सोमवारी प्रशासन दरबारी जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या लावून धरल्या. राजकीय क्षेत्रातील ओबीसी आरक्षण कायम ठेवावे, यासाठी झालेला रस्ता रोको तसेच जिल्ह्यातील परिचारिका, आशासेविका आणि मूकबधिरांच्या प्रश्नांवर २१ जून रोजी आंदोलने झाली.

मूकबधिरांचा ठिय्या

दिव्यांगबांधवांच्या विविध मागण्यांसाठी २१ जून रोजी मूकबधिर एकता असोसिएशनच्यावतीने मनपा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांना उर्वरित ४ हजार रुपये मार्च महिन्यात वाटप केले जातील, असे आश्‍वासन मनपा प्रशासनाने दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत निधी वाटप केला नाही. कोरोनाच्या संकटामुळे दिव्यांगबांधव अडचणीत आहेत. मात्र प्रशासन डोळेझाक करत असल्याने संघटनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मूकबधीर बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते.

आशा, गटप्रवर्तकांचे आंदोलन

आयटकप्रणित आरोग्य विभाग आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. अशांना १८ हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना २१ हजार रुपये फिक्स पगार द्यावा, या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, किमान वेतन द्यावे, दरमहा मानधनात वाढ करावी, कोरोनाचा प्रोत्साहन भत्ता प्रतिदिन ५०० रुपये याप्रमाणे द्यावा, कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांएवढे वेतन द्यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरुड, राजू देसले, सुमन पुजारी, माधुरी क्षीरसागर, मुक्ता शिंदे, दिवाकर नागपुरे, विनोद झोडगे, वंदना हिवराळे, वंदना हाके, नामदेव शिंदे, संजीवनी स्वामी, आशा तिडके, बाबाराव आवरगंड, वंदना पाईकराव, पांडुरंग कस्तुरे, सारिका चांदणे आदी सहभागी झाले होते.

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही महागाईचा निषेध करत सोमवारी आंदोलन केले. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलासह भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत तेव्हा महागाई नियंत्रणात आणावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष आलमगीर खान, सुमित जाधव, कलिम खान, अशोक पोटभरे, संपत नंदनवरे, सुनील बावळे, कैलास पवार, अजित खंदारे, कैलास लहाने, प्रमोद कुटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Monday was an agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.