पैसा झाला खोटा; दहा रुपयांचे नाणे चालेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:11+5:302021-09-21T04:20:11+5:30
परभणी : बाजारपेठेमध्ये खेळती चिल्लर रहावी, यासाठी दहा रुपयांचे नाणे चलनात आणल्या गेले. परंतु, जिल्ह्यात मात्र हे नाणे बहुतांश ...
परभणी : बाजारपेठेमध्ये खेळती चिल्लर रहावी, यासाठी दहा रुपयांचे नाणे चलनात आणल्या गेले. परंतु, जिल्ह्यात मात्र हे नाणे बहुतांश ठिकाणी स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे चलणी बंदा खोटा असल्याची भावना आता ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. आरबीआयची मान्यता असताना आणि बँकांकडूनही हे नाणे चलनात आणले असताना व्यवहारात मात्र या नाण्याला शून्य किंमत मिळू लागली आहे.
कुठल्याच नाण्यावर बंद नाही
दहा रुपयांचे नाणे जिल्ह्यात व्यापारी स्वीकारत नाहीत. मुळात दहा रुपयांच्या नाेटेएवढेच मूल्य या नाण्याचेे आहे. विशेष म्हणजे या नाण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही. परभणी जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात मात्र दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जाते. दहा रुपयांच्या नाण्याला बंदी नसल्याची माहिती बँक प्रशासनाने दिली.
कोणती नाणी नाकारतात
दहा रुपयांचा बंदा तसेच ५० पैशांचे नाणेही बाजारात स्वीकारले जात नाहीत. विशेष म्हणजे या दोन्ही नाण्यांना कोणतीही बंदी नाही. एक रुपया, दोन रुपयांची व पाच रुपयांची नाणी मात्र स्वीकारली जातात.
बँकेतही नाण्यांचा मोठा साठा पडून
मागील वर्षभरापासून बाजारपेठेत नोटांच्या तुलनेत चिल्लर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बँकांमध्येही या चिल्लरचा साठा अधिक आहे. तसेच चलनातही चिल्लर वाढली आहे.
दहा रुपयांच्या नाण्याला बंदी नसतानाही ते चलनात चालत नाहीत. त्यामुळे खिशात पैसे असूनही अनेक वेळा अडचण निर्माण होते. या संदर्भात बँक प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन हे नाणे चलनात आणण्यासाठी प्राधान्याने कारवाई करणे गरजेचे आहे.
- विष्णू जाधव