गायरानधारकांसह इतर प्रश्नांवर धडकला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:26 AM2021-02-23T04:26:11+5:302021-02-23T04:26:11+5:30
जिल्ह्यातील गायरान, वनीकरणधारकांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात, ज्या गायरानधारकांना यापूर्वी सातबारा देण्यात आला आहे, त्यांच्या सातबारातून पोटखराब हा ...
जिल्ह्यातील गायरान, वनीकरणधारकांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात, ज्या गायरानधारकांना यापूर्वी सातबारा देण्यात आला आहे, त्यांच्या सातबारातून पोटखराब हा शब्द वगळण्यात यावा, प्रत्येक गावात मागासवर्गीयांना स्वतंत्र स्मशानभूमी द्यावी, ज्या गावात स्वतंत्र स्मशानभूमी आहे, तेथे अतिक्रमण झाले असून, ते हटवावे, पूर्णा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात करण्यात आलेले अतिक्रमण काढावे, मागासवर्गीय व आदिवासींसाठी आर्थिक तरतुदींचा कायदा करावा, यासह विविध १७ मागण्या या मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात आल्या.
मानवी हक्क अभियान, भीमप्रहार संघटना आणि बहुजन मजूर पक्षाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले होते. भीमप्रहार संघटनेचे संस्थापक प्रा. प्रवीण कनकुटे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १ वाजता जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानापासून मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद कार्यालय, उड्डाणपूल, बसस्थानक, रेल्वेस्थानकामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केेले. मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष पप्पूराज शेळके, भीमप्रहारचे प्रा. डॉ. प्रवीण कनकुटे, बहुजन मजूर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ कसबे, विश्वजित वाघमारे, ॲड. विष्णू ढोले, मारोती साठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.