करंट ट्रान्सफार्मर जळाल्याने बहुतांश भाग अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:30 AM2021-03-13T04:30:58+5:302021-03-13T04:30:58+5:30
१३२ केव्ही वीज उपकेंद्रामधून ३२ के.व्ही. वीज उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या करंट ट्रान्सफार्मरमध्ये गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बिघाड ...
१३२ केव्ही वीज उपकेंद्रामधून ३२ के.व्ही. वीज उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या करंट ट्रान्सफार्मरमध्ये गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बिघाड झाला. हा ट्रान्सफार्मर अचानक जळाल्याने जिंतूर रोड आणि शहराच्या मध्य भागातील काही वसाहतींचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र या कामासाठी साधारणत: तीन ते साडेतीन तास वेळ लागणार असल्याने रात्री १० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. दरम्यान, पर्यायी व्यवस्था करत काही भागांमध्ये दुसऱ्या वीज वाहिनीवरून वीजपुरवठा जोडण्यात आला. त्यामुळे ९ वाजण्याच्या सुमारास दर्गा रोड आणि परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत झाला. तसेच ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठाही बंद ठेवला होता. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अंधार निर्माण झाला होता. दुरुस्तीचे काम हाती घेतले असून लवकरच वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.