परभणी जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यावर खड्डे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:10 AM2017-12-16T01:10:29+5:302017-12-16T01:11:11+5:30

१५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली घोषणा फसवी ठरली असून परभणी जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खड्डेयुक्तच असल्याची परिस्थिती शुक्रवारी ‘लोकमत’च्या चमुने केलेल्या पाहणीत आढळून आली आहे.

Most of the roads in the district of Parbhani have potholes | परभणी जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यावर खड्डे कायम

परभणी जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यावर खड्डे कायम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली घोषणा फसवी ठरली असून परभणी जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खड्डेयुक्तच असल्याची परिस्थिती शुक्रवारी ‘लोकमत’च्या चमुने केलेल्या पाहणीत आढळून आली आहे. राज्यभरातील बहुतांश रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन सचिव आनंद कुलकर्णी यांनी २०१५ मध्ये राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील, असे सांगितले होते. त्यानंतर दुसºयांदा याच विभागाचे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनीही १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा गेल्या महिन्यात परभणी दौºयावर आल्यानंतर केली होती. त्या अनुषंगाने १५ डिसेंबर रोजी जिल्हाभरातील ‘लोकमत’च्या वार्ताहरांमार्फत रस्त्यांची पाहणी केली असता बहुतांश प्रमुख रस्त्यांवर खड्डे कायम असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले असले तरी त्याचे काम मात्र निकृष्ट दर्जाचे झाल्याने बुजविलेले खड्डे महिनाभरातच उघडे पडत आहेत. त्यामुळे त्याचा वाहनधारकांना होणारा त्रास कायम असल्याची परिस्थिती शुक्रवारी दिसून आली.
परभणी ते वसमत या महामार्गावरील ७५ टक्के खड्डे बुजविल्यानंतरही निकृष्ट कामांमुळे जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी या महामार्गाची पहाणी केली असता मार्गावरील ई-चौपाल परिसरात महामार्गावर भेगा पडल्या आहेत. तर रेंगे पाटील विद्यालय, मातोश्री वृद्धाश्रम परिसरातील रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. ओंकार कॉटन जीन परिसरातील वळण रस्त्यावरील धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे धोका निर्माण होत आहे. यासमोर पारसमनी गॅस पंप परिसरातही रस्ता अनेक ठिकाणी उखडलेलाच आहे. धामोडा पूल परिसरात तर पुलाच्या दोन्ही बाजुंनी काही अंतरावर खड्डे जैसे थे आहेत. पुलावर काही ठिकाणी डांबर फासण्याचा प्रयत्न केला. परंतु, कामाचा दर्जा मात्र सुमारच दिसून आला. त्रिधारा क्षेत्र कमान समोरील रस्त्यावरही धोकादायक खड्डे आहेत. येथील खड्डेही यापूर्वी बुजविण्यात आले नसल्याचे पहावयास मिळाले. राहटी पुलावर डांबर टाकण्यात आले आहे. परंतु, थातुरमातूर काम करण्यात आले.
ऐन राहटी पुलावर चुरी बाजुला पडलेली आहे. तर रस्ताही साफ झाला नसल्याने खड्डे जाणवत आहेत. पुलाला लागूनच परभणीकडील बाजुने खड्डे पडल्याने येथून वाहन चालविताना चालकाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तर हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठातून सायाळा खटींग, रायपूर गावाकडे जाणाºया रस्त्यावरही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते खड्डेही सांबा विभागाने बुजविलेले नाहीत.
परभणी- जिंतूर रस्ता खड्डेमय
परभणी- जिंतूर या महामार्गावर बोरीपासून झरीपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. तसेच परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते परभणी या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. धर्मापुरी परिसरात तर अक्षरश: राज्यरस्त्याची चाळणी झाली आहे. वाहनधारकांना वाहने चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच परभणी शहरानजीक असलेल्या विसावा चौक परिसरात ऐन रस्त्याच्या मधोमध दोन खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना अपघातांनाही सामोरे जावे लागले. शहरातील उड्डाणपुुलावर तर जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेनंतरही परभणी तालुक्यातील राष्ट्रीय, राज्य व ग्रामीण रस्ते खड्डेमुक्त नव्हे तर खड्डेयुक्त असल्याचे शुक्रवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले.
कार्यकारी अभियंता संजय पार्डीकर यांचा प्रतिसाद नाही
४सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जिल्हाभरात करण्यात आलेल्या कामाच्या अनुषंगाने प्रतिक्रियेसाठी कार्यकारी अभियंता संजय पार्डीकर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Most of the roads in the district of Parbhani have potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.