गोदापात्रात बुडून आई व मुलाचा मृत्यू; मुलीस वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 06:48 PM2018-06-05T18:48:01+5:302018-06-05T18:48:01+5:30
गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा तिच्या मुलासह बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील डाकूपिंप्री येथे घडली.
पाथरी (परभणी ) : गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा तिच्या मुलासह बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील डाकूपिंप्री येथे घडली. याचवेळी बुडणाऱ्या मुलीस वाचविण्यास यश आले.
तालुक्यातील डाकूपिंप्री येथील शोभा सर्जेराव रुमाले ( ३२ ) या आज सकाळी ११.३० च्या दरम्यान गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आर्यन (६ ) व मुलगी अर्पिता (९ ) होते. शोभा पकडे धुण्यात व्यस्त असताना आर्यन व अर्पिता पात्रात उतरले. आर्यन कमी पाण्यात पोहत असतानाच तो पात्रातील खोल खड्ड्याकडे गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो त्यात बुडू लागला हे शोभा यांच्या लक्षात आले असता त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली मात्र त्यासुद्धा त्या बुडू लागल्या. हे पासून अर्पिताने मदतीसाठी आरडाओरडा केली त्या दोघांना वाचवण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली मात्र तीही त्यात बुडू लागली.
याच दरम्यान रामभाऊ सटवाजी महात्मे हे गावातुन आपल्या शेतीकडे जात होते. त्यांना हा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांनी लागलीच पाण्यात उडी मारली आणि प्रथम अर्पिताला बाहेर काढले. मात्र, शोभा व आर्यन यांना वाचवण्यात त्यांना यश आल नाही. काही वेळाने आजूबाजूचे शेतकरी तेथे मदतीसाठी धावले. त्यांनी शोभा आणि आर्यन यांची मृतदेह ताब्यात घेतली. पोलीस पाटील उद्धव सोनवणे यांनी पाथरी पोलिसांत घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमनवार, सह पोलीस उपनिरीक्षक जी आर कालापाड यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.