परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 06:30 PM2018-09-11T18:30:25+5:302018-09-11T18:31:02+5:30
परभणी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी आज सकाळी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
परभणी-परभणी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी आज सकाळी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परभणी जिल्ह्यासाठी मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इतर जिल्ह्यात हलविल्याने जिल्ह्यात नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी खा.बंडू जाधव यांनी आंदोलन उभे केले आहे. आठ दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. आज विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी रेटून धरत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सकाळी ११ वाजेपासूनच प्रमुख रस्त्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले. ‘वैद्यकीय महाविद्यालय आमच्या हक्काचे... ’ ‘महाविद्यालय मिळवणारच’, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करीत परभणी जिल्ह्याची मागणी लावून धरली. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांच्याच हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.