वैद्यकीय महाविद्यालयासाठीचे आंदोलन म्हणजे नौटंकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:19 AM2021-09-03T04:19:24+5:302021-09-03T04:19:24+5:30
परभणी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने खाजगी भागीदारी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे परभणीतील ...
परभणी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने खाजगी भागीदारी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे परभणीतील महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांचे मुंबईत कसल्याही प्रकारचे वजन नाही. केवळ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाखाली आंदोलन केले जात आहे, ही नौटंकी आहे, असा आरोप भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी खासदार बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ सप्टेंबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या अनुषंगाने गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांचीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी इच्छा नाही. शिवाय त्यांचे मुंबईत कसल्याही प्रकारचे वजन नाही. आंदोलन करायचेच असेल तर मुंबई करा आम्ही तेथे सोबत येऊ. राज्य सरकारने खासगी भागिदारी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. हे माहीत असूनही परभणीकरांची दिशाभूल करण्यासाठी आंदोलनाची नौटंकी केली जात आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी राज्य शासनाकडून वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीचा ठराव घ्यावा आपण तो केंद्रातून मंजूर करून आणू, असेही त्यांनी सांगितले.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलन : भरोसे
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाखाली महाविकास आघाडीतील जिल्ह्यातील नेत्यांकडून आंदोलन केले जात आहे. ही जनतेची फसवणूक असून, आंदोलन करायचे असेल तर मुंबईत करा, आम्ही सोबत येऊ. जिल्ह्यातील नेत्यांनी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली नाही, याचे उत्तर द्यावे. सर्वत्र सह्यांची मोहीम राबवून उपयोग नाही. राजीनाम्याच्या पत्रावर आमदार, खासदारांनी सह्या करून मग आंदोलन करावे, असेह यावेळी भरोसे म्हणाले. पत्रकार परिषदेस सुनील देशमुख, दिनेश नरवाडकर, रितेश जैन, मधुकर गव्हाणे आदींची उपस्थिती होती.