परभणी जिल्ह्यात आंदोलन : मानवत, पालम, पूर्णेत आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:32 AM2018-08-01T00:32:51+5:302018-08-01T00:33:43+5:30

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात मंगळवारीही ठिकठिकाणी आंदोलने झाली. मानवत येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तर पालम तालुक्यात रास्तारोको करण्यात आला.

Movement in Parbhani district: Movement in Manavat, Palam, Purnate | परभणी जिल्ह्यात आंदोलन : मानवत, पालम, पूर्णेत आंदोलने

परभणी जिल्ह्यात आंदोलन : मानवत, पालम, पूर्णेत आंदोलने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात मंगळवारीही ठिकठिकाणी आंदोलने झाली. मानवत येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तर पालम तालुक्यात रास्तारोको करण्यात आला.
३१ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १२ असे दोन तास मानवत येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गजानन बारहाते, नगरसेवक दीपक बारहाते, गोविंद घाटगे, कृष्णा शिंदे, अक्षय कदम, रामप्रसाद काळे, परशूराम कापसे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, अज्ञात समाजकंटकांनी आंदोलनस्थळी विद्युत खांबाची मोडतोड करुन वीज पुरवठा खंडित केला. आंदोलनस्थळी पोलीस सुरक्षा पुरविणे आवश्यक असताना एकही कर्मचारी तहसील कार्यालयात फिरकला नाही, असे आंदोलकांनी सांगितले. शांततेने चालणाऱ्या आंदोलनास गालबोट लावण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार केला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गजानन बारहाते यांनी केला आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांनी दिले.
पालममध्ये रास्तारोको
पालम- मराठा समाजाला आरक्षण द्यावे व खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी तालुक्यात मंगळवारी आंदोलन करण्यात आले. राज्य रस्त्यावर कापसी फाटा येथे सकाळी ११ वाजता रास्तारोको करण्यात आला. तर शहरातील मुख्य चौकात काही युवकांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. पालम-गंगाखेड राज्य रस्त्यावर केलेल्या आंदोलनामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजुंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पालम शहरात मुख्य चौकात सकाळी १० वाजेपासून युवक एकत्र येत होते. या ठिकाणी अनेक युवकांनी मुंडन करुन शासनाचा निषेध नोंदविला. आंदोलन दडपण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ युवकांनी मुंडन केले.
एस.टी.वर दगडफेक
ताडबोरगाव- मानवत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हा येथे एस.टी.वर दगडफेक केल्याची घटना ३१ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. एम.एच.२० बीएल ११५० ही बस सेलू वरुन परभणीकडे जात होती. बस कोल्हापाटीच्या पुढे आली असता अज्ञात व्यक्तींनी बसवर दगडफेक करुन बसच्या समोरील व पाठीमागील काचा फोडल्या.
महागाव येथे अर्धजलसमाधी आंदोलन
ताडकळस- सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी ३१ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास महागाव येथे गोदावरी नदीपात्रात उड्या घेऊन अर्धजलसमाधी आंदोलन करण्यात आले. पूर्णा प्रशासनाच्या वतीने १ बोट व रेसक्यू आॅपरेशन पथक या ठिकाणी तैनात केले होते. या पथकाने वेळीच दक्षता घेऊन आंदोलकांना नदीपात्रातून बाहेर काढले.

Web Title: Movement in Parbhani district: Movement in Manavat, Palam, Purnate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.