परभणीत निकालासाठी विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:36 AM2018-08-26T00:36:12+5:302018-08-26T00:37:05+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून गेल्या चार महिन्यांपासून विविध विषयांच्या परीक्षांचे निकाल लावले जात नसल्याच्या कारणावरुन व अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांच्या वतीने शनिवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून गेल्या चार महिन्यांपासून विविध विषयांच्या परीक्षांचे निकाल लावले जात नसल्याच्या कारणावरुन व अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनांच्या वतीने शनिवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सर्व पदवी शाखेच्या परीक्षांचा निकाल लागला नसल्याने विद्यार्थ्यांना आयसीआर, एमसीएईआर आदी उच्च शिक्षणाच्या प्रवेशापासून वंचित रहावे लागत आहे. या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही गेल्या चार महिन्यांपासून निकाल लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एनएसयुआय, एआयएसएफ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या विद्यार्थी संघटनांच्या वतीने शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर कुलगुरु डॉॅ.अशोक ढवन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी एनएसयुआयचे अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, एआयएसएफचे जिल्हाध्यक्ष विश्वास कदम, संदीप सोळंके, अॅड.लक्ष्मण काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक वारकरी आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या
कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रमांचे शुल्क कमी करावे, दोन वर्षापासून प्रलंबित असलेले विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अदा करावे, यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता तात्काळ द्यावा, आयसीईआरकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वितरित करावी, ३ वर्षापासून प्रलंबित असलेली एससी, एसटी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रदान करावी, ईबीसी सवलत देण्यात यावी, पीएच.डी.च्या जागांवर विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात यावा आदी मागण्या आहेत.