बससाठी सात गावांतील विद्यार्थ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 08:40 PM2017-09-18T20:40:12+5:302017-09-18T20:40:44+5:30
परभणी-पालम ही स्वतंत्र बस सोडविण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७़३० ते १० या वेळेत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले़
परभणी- विद्यार्थ्यांसाठी परभणी-पालम ही स्वतंत्र बस सोडविण्यात यावी, या मागणीसाठी सात गावांतील विद्यार्थ्यांनी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७़३० ते १० या वेळेत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले़
परभणी आगारातून सुटणाºया परभणी- पालम या बसमधून धानोरा काळे, कळगाव वाडी, ताडकळस, सिरसकळस, बलसा, मिरखेल, पिंगळी या सात गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी परभणी शहराकडे दररोज ये-जा करतात़ या विद्यार्थ्यांनी महामंडळाकडून विद्यार्थी पासेसही घेतल्या आहेत; परंतु, परभणी आगारातून सुटणाºया परभणी- पालम या बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी ये-जा करतात़ त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही़ परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी उशिर होतो़
परभणी- पालम ही बस विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सोडण्यात यावी, या मागणीसाठी या सात गावांतील विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी ७़३० वाजता परभणीत जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांचे निवासस्थान गाठले़ या ठिकाणी ७़३० ते १० असे जवळपास अडीच तास ठिय्या आंदोलन केले़
जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी महामंडळाच्या संबंधित अधिकाºयांना बोलावून विद्यार्थ्यांसमक्ष परभणी-पालम ही बस स्वतंत्र सोडण्यात यावी, असे आदेश दिले़ त्यानंतर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सिरसाठ यांनी मंगळवारपासून बस आपल्याला उपलब्ध होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले़
आंदोलनात ६० विद्यार्थ्यांचा सहभाग
परभणी- पालम या बसमध्ये वारंवार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जातात़ परिणामी अनेक विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांची दररोज गैरसोय होत आहे़ त्यामुळे धानोरा काळे, कळगाव वाडी, ताडकळस, बलसा, सिरसकळस, मिरखेल, पिंगळी या गावांतील ६० विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.