मजुराच्या मुलाची एमपीएससीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:18 AM2021-07-30T04:18:50+5:302021-07-30T04:18:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी इतरांच्या शेतात मजुरी करून उपजीविका करणाऱ्या सुरेशअप्पा खुपसे यांचा मुलगा गणेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी इतरांच्या शेतात मजुरी करून उपजीविका करणाऱ्या सुरेशअप्पा खुपसे यांचा मुलगा गणेश खुपसे यांनी जिद्दीच्या बळावर न्यायाधीशपदापर्यंत यशस्वी भरारी घेतली आहे.
मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील रहिवासी असलेले गणेशअप्पा खुपसे २०१५ मध्ये शिक्षणाच्या निमित्ताने परभणी शहरात दाखल झाले आणि शिक्षण घेतघेत त्याच ठिकाणी स्थायिक झाले.
सुरुवातीला शिवाजी महाविद्यालयातून डी.टी.एड. अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी काही काळ करसल्लागार अंशुमन महाजन यांच्याकडे काम केले. त्यानंतर शिवाजी विधी महाविद्यालयात एल.एल.बी. आणि एल.एल.एम. पदवी संपादन केली. विशेष म्हणजे एल.एल.बी.च्या अंतिम वर्षात गणेश खुपसे यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
परभणी येथेच ॲड. डी.जी. गुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरू केली. वकिली करीत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारीही त्यांनी केली. २०१९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी त्यांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात ते एमपीएससी उत्तीर्ण झाले. राज्यातील १९० उमेदवारांनी यश मिळविले असून त्यात गणेश खुपसे यांची १७ वी रॅँक आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांची बुुलडाणा जिल्ह्यात न्यायाधीशपदावर नियुक्ती झाली आहे.
विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन
परभणी येथे शिक्षण घेत असताना विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यात कौटुंबिक न्यायालयाचे न्या. अकबर, न्या. ओंकार देशमुख त्याचप्रमाणे परभणी येथील ॲड.डी.जी.गुंजकर, ॲड.जीवन पेडगावकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळेच एमपीएससी परीक्षेत हे यश संपादन करू शकलो, असे गणेश खुपसे यांनी सांगितले.