महावितरणचे शहर कनिष्ठ अभियंत्याचे कार्यालय हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:45+5:302020-12-15T04:33:45+5:30
पूर्णा : वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कार्यालय शहराबाहेर ४ किमी अंतरावर हलविले आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा ...
पूर्णा : वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कार्यालय शहराबाहेर ४ किमी अंतरावर हलविले आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे कार्यालय शहरात पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी एमआयएमच्या वतीने एका निवेदनाद्वारे महावितरण कंपनीकडे केली आहे.
वीज ग्राहकांच्या तक्रारी निवारण व सुविधांसाठी पुर्णेच्या बाजारपेठेत असलेले शहर शाखेच्या कनिष्ठ अभियंत्यांचे कार्यालय, फ्युज कॉल सेंटर शहराबाहेरील ताडकळस रस्त्यावर हलविले आहे. पूर्णा शहरापासून ४ किमी दूर अंतरावर हे कार्यालय हलविल्यामुळे विजेच्या संदर्भात बिलांची दुरुस्ती, नवीन विद्युत जोडणी, विजेच्या तक्रारी घेवून येणाऱ्या ग्राहकांना पायपीट करावी लागत आहे. विशेषत: महिला व वृद्ध ग्राहकांची गैरसोय होत आहे. वेळी-अवेळी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ताडकळस रस्त्यावर असलेल्या वीज केंद्रात हलविण्यात आलेल्या शहरातील कनिष्ठ अभियंत्याचे कार्यालय तातडीने पूर्वीच्या जागीच स्थलांतरित करावे, अशी मागणी एमआयएमच्या वतीने १४ डिसेंबर रोजी एका निवेदनाद्वारे महावितरण कंपनीकडे केली आहे. निवेदनावर शेख हबीब बागवान, शेख मुक्तार, शेख साबेर, आसाराम भनगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.