म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; पाच जणांना रुग्णालयातून दिली सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:33+5:302021-06-16T04:24:33+5:30

परभणी : म्यूकरमायकोसिस या गंभीर आजाराच्या नव्या रुग्णांची संख्या कमी झाली असून, कोरोनापाठोपाठ आता म्यूकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात ...

Mucomycosis on the way back; Five were discharged from the hospital | म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; पाच जणांना रुग्णालयातून दिली सुटी

म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला; पाच जणांना रुग्णालयातून दिली सुटी

Next

परभणी : म्यूकरमायकोसिस या गंभीर आजाराच्या नव्या रुग्णांची संख्या कमी झाली असून, कोरोनापाठोपाठ आता म्यूकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या गंभीर आजारामुळे रुग्णांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. या आजारावर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध नसली तरी प्राथमिक उपचार केले जात आहेत. या आजाराचे १३ उपचाराधिन रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. पाच रुग्णांना आतापर्यंत सुटी देण्यात आली आहे. साधारणत: ४० टक्के रुग्णांना सुटी मिळाल्याने कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस हा आजारही परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत.

कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांना म्युकरमायकोसिसची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे कोरोना ओसरल्यानंतरही जिल्हावासीयांत धास्ती निर्माण झाली होती; मात्र मागच्या आठवडाभरापासून म्युकरमाकोसिसची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसपासूनही दिलासा मिळत आहे.

औषधांचा पुरेसा साठा

म्युकरमायकोसिस या आजारावर सुरुवातीच्या काळात इंजेक्शन व औषधांचा तुटवडा जिल्ह्यात निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक रुग्णांना परजिल्ह्यात जाऊन उपचार घ्यावे लागले.

सद्यस्थितीला जिल्ह्यात म्युकरमायकोसिसवरील औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे रुग्णांची संख्या कमी झाल्याने या औषधांनाही मागणी कमी झाल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणे

म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीचा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये आढळत आहे. ज्या रुग्णांना गंभीर स्वरूपाचा आजार आहे, त्याचप्रमाणे तीव्र मधुमेह असणाऱ्या रुग्णांना कोविड काळात स्टुरॉईडचा वापर झाल्यास किंवा हायफ्लो ऑक्सिजन लागलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळू शकतात.

डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे, डोळ्याजवळ काळे व्रण पडणे, दात वारंवार दुखणे, दाताजवळ काळा थर साचणे अशी या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार उद्‌भण्याची शक्यता असते. तेव्हा तीव्र मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर नियमित तपासणी करावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

शस्त्रक्रियेची जिल्ह्यात नाही सुविधा

म्युकरमायकोसिसची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्यामुळे प्राथमिक लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर येथे उपचार होतात.

म्युकरमायकोसिसमुळे डोळ्यांवर किंवा दातांवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास अशा रुग्णांना लातूर, नांदेड, औरंगाबाद, मुंबई या मोठ्या शहरात हलवावे लागते. त्यामुळे गंभीर आजाराच्या रुग्णांविषयीची माहिती आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही.

ही घ्या काळजी

तीव्र स्वरूपाचा मधुमेह किंवा गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर प्रत्येक आठ दिवसांना तपासणी करावी. मधुमेहाची तपासणी नियमित करावी. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घ्यावेत.

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन तज्ज्ञांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. लवकरच शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्यही उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

-डाॅ. किशोर सुरवसे, निवासी वैद्यकीय अधिकारी.

Web Title: Mucomycosis on the way back; Five were discharged from the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.