परभणीत मनपा कर्मचाऱ्याचे आठव्या दिवशीही काम बंद; थकीत पगारासाठी काढला मोर्चा
By राजन मगरुळकर | Published: March 5, 2024 01:17 PM2024-03-05T13:17:07+5:302024-03-05T13:17:33+5:30
शहरातील महापालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी तसेच स्वच्छता कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांचे किमान तीन ते चार महिन्याचे वेतन थकीत आहे.
परभणी : शहर महापालिकेच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्तांचे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकित पगार देण्यात यावेत, या मागणीसाठी आठ दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू आहे. मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी दुपारी बारा वाजता शहरातील शनिवार बाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात सहभागी कर्मचाऱ्यांनी मनपा प्रशासनाचा आणि आयुक्त यांच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी देत पगाराची मागणी लावून धरली.
शहरातील महापालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी तसेच स्वच्छता कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांचे किमान तीन ते चार महिन्याचे वेतन थकीत आहे. सर्व वेतन देण्यात यावेत सोबतच पगाराच्या अनुदानापोटी महापालिकेला राज्य शासनाने अर्थसहाय्य करावे आणि इतर सात मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन सुरू आहे.
दररोज वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे आणि राज्य शासनाचे लक्ष वेधले जात आहे. मंगळवारी शनिवार बाजार ते शिवाजी चौक, गुजरी बाजार, स्टेशन रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. ढोल ताशाच्या गजरात घोषणाबाजी देत मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे साकडे प्रशासनाला घालण्यात आले.