गळ्यावर चाकूने वार करून खून; आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास

By राजन मगरुळकर | Published: December 16, 2023 05:06 PM2023-12-16T17:06:10+5:302023-12-16T17:06:20+5:30

सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासले.

Murder by stabbing to the neck; 10 years rigorous imprisonment for the accused | गळ्यावर चाकूने वार करून खून; आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास

गळ्यावर चाकूने वार करून खून; आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास

परभणी : नानलपेठ ठाण्यात जानेवारी २०२२ मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील प्रकरणात जिल्हा न्यायालयातील दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश ए.ए.शेख यांनी शनिवारी निकाल दिला. यामध्ये आरोपी शेख मेराज उर्फ मेहराज शेख शकील यास सदोष मनुष्यवधाच्या अपराधासाठी दोषी धरून दहा वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

नानलपेठ ठाण्यात २४ जानेवारी २०२२ ला नसरीन बेगम शेख रफीक यांनी फिर्याद दिली. ज्यात नमूद केले, २३ जानेवारी २०२२ रोजी त्यांची बहीण शाहीन बेगम यांनी फोन करुन कळवले, फिर्यादीची मुलगी शरीन बेगम हिला तिचा दीर शेख मेराज उर्फ मेहराज शेख शकील याने पोटावर लाथ मारल्याने तिच्या पोटात दुखत आहे व ती सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहे, असे कळविले. त्यानंतर फिर्यादी व तिचा पती शेख रफिक शेख गणी व मुलगा शेख यासीन हे दूचाकीवर मुलीचे रिपोर्ट घेऊन सरकारी दवाखान्यात जात असताना आरोपी शेख मेराज उर्फ मेहराज शेख शकील हा समद प्लॉटिंगच्या कॉर्नरजवळ उभा होता. त्याने दुचाकीला लाथ मारल्याने फिर्यादी, पती व मुलगा हे खाली पडले.

यानंतर आरोपी शेख मेहराज याने मै तुमको जिंदा नही छोडूंगा, तुझे खतम करता हु असे म्हणत आरोपीने फिर्यादीच्या पतीच्या गळ्यावर चाकू मारला. यामध्ये फिर्यादीचा पती शेख रफिक जखमी झाले. त्यास उपचारास सरकारी व खासगी दवाखान्यात नेले. अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. नसरीन बेगम शेख रफीक यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ ठाण्यात कलम ३०७, ३४१ भादविनुसार गुन्हा दाखल झाला. उपचारादरम्यान जखमी मयत झाल्यामुळे गुन्ह्यात कलम ३०२ नुसार वाढ झाली. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सांगळे यांनी केला. प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार यांचे जवाब नोंदवून घटनास्थळी पंचनामा केला. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले. आरोपीच्या कपड्यावर, शस्त्रावर रक्ताचे डाग आढळले होते. तपासाअंती सपोनि.सांगळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सहा साक्षीदार तपासले...
खटला दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश ए.ए.ए.शेख यांच्या न्यायालयात चालला. त्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षीतून शेख रफीक यांचा मृत्यू केवळ हा मनुष्यवध असून जप्त केलेल्या शस्त्रामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे जप्त केलेले कपडे व चाकू यावर मयत शेख रफिक यांच्या रक्ताचा अंश आढळला. त्याबद्दल आरोपीने कोणताही खुलासा केला नाही. प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार यांनी न्यायालयासमोर आरोपी शेख मेराज याने चाकूने गळ्यावर वार करून खून केला, असे सांगितले. त्यावरून न्यायालयाने आरोपीस सदोष मनुष्यवधाच्या अपराधासाठी दोषी धरले व आरोपीस कलम ३०४ भाग एक भादविमध्ये दहा वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याच्या सश्रम कारावास, कलम ३४१ भादविनुसार पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

यांनी मांडली बाजू
खटल्यामध्ये मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील नितीन खळीकर यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार डि.के.खुणे यांनी काम पाहिले.

Web Title: Murder by stabbing to the neck; 10 years rigorous imprisonment for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.