परभणी जिल्ह्यातील परळी येथील खून प्रकरण :आई, मुलगी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:08 AM2019-03-31T00:08:35+5:302019-03-31T00:09:00+5:30
परळी येथील युवकाच्या खून प्रकरणातील मुलगी व तिच्या आईला पूर्णा पोलिसांच्या पथकाने २९ मार्च रोजी तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): परळी येथील युवकाच्या खून प्रकरणातील मुलगी व तिच्या आईला पूर्णा पोलिसांच्या पथकाने २९ मार्च रोजी तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतले आहे.
परळी येथील युवक अजय अशोक भोसले याचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा उलगडा पूर्णा पोलिसांनी केला होता. मात्र या प्रकरणातील मुलगी, त्या मुलीची आई व खून करण्यात सहभागी असलेले दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. ही मुलगी परळी येथे राहत असली तरी तिचे मूळ गाव हे तेलंगणा राज्यात आहे. तपासाची दिशा वारंवार या भागात फिरत असल्याने पोलिसांनी तेलंगणा राज्यातच तपास सुरु केला. फौजदार चंद्रकांत पवार, जमादार मिर्झा शमशाद बेग, विष्णू भिसे, मंगेश जुक्टे, समीर पठाण, सहाय्यक फौजदार चतुराबाई गावंडे आदींनी शोध घेतला असता २९ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुलीची आई व मुलगी पोलिसांना सापडली. दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावण्यासाठी मुलीचा शोध लागणे आवश्यक होते. त्यामुळे तेलंगणा पोलिसांच्या मदतीने मुलगी व तिच्या आईस ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक राठोड यांनी दिली.