उसने घेतलेल्या ३०० रुपयांच्या वादातून युवकाचा खून; चौघांना जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 12:48 PM2022-03-16T12:48:30+5:302022-03-16T12:51:38+5:30
हात उसने दिलेल्या ६०० रूपयांवरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात वाद झाले, यातून पैसे देणाऱ्या तरुणाचा खून झाला.
परभणी : धारदार शस्त्राचे वार करून एका युवकाचा खून करणाऱ्या चार आरोपींना परभणी येथील जिल्हा न्यायालयाने १५ मार्च रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सेलू तालुक्यातील कुंडी येथे राहुल देविदास डंबाळे याचा १८ मार्च २०२० रोजी खून झाला होता. खून करून आरोपी १८ मार्च रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास शस्त्रांनिशी पोलीस ठाण्यात दाखल झाले. आम्ही खून केला असल्याची माहिती आरोपींनीच पोलिसांना दिली. या घटनेनंतर तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी प्रयागबाई देविदास डंबाळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली.
प्रयागबाई यांचा मुलगा राहुल याने त्यांच्या शेजारी राहात असलेल्या एकनाथ डंबाळे यास ६०० रुपये उसने दिले होते. एकनाथ याने ३०० रुपये परत केले, तर राहिलेल्या ३०० रुपयांवरून एकनाथ डंबाळे व राहुल यांच्यामध्ये १७ मार्च २०२० रोजी वाद झाला होता. याच वादातून १८ मार्च २०२० रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास प्रयागबाई डंबाळे आणि त्यांचा मुलगा राहुल डंबाळे घरासमोर बसले असताना संतोष, कपिल तसेच त्याच्यासोबत असलेला एक अनोळखी व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आले. माझ्या आईवडिलांना का मारले, असे विचारत हातातील कोयत्याने राहुलवर सपासप वार केले. यावेळी प्रकाश डंबाळे यानेही इतरांना धमक्या दिल्या. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
येथील जिल्हा न्यायालयात १५ मार्च रोजी जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख यांच्यासमोर ११ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने प्रमुख सरकारी वकील ॲड. ज्ञानोबा दराडे यांनी बाजू मांडली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रयागबाई व संगीता डंबाळे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. शवविच्छेदन अहवाल, शस्त्र जप्ती पंचनामा यावरून आरोपीविरुद्ध परिस्थितीजन्य पुरावेही उपलब्ध झाले होते. साक्षीपुराव्याअंती जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी आरोपी संतोष एकनाथ डंबाळे, कपिल एकनाथ डंबाळे, प्रकाश एकनाथ डंबाळे आणि मिलिंद देविदास कांबळे (सर्व रा. पंचवटी, नाशिक) यांना दोषी ठरवून खुनाच्या प्रकरणात जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक कपिल शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, वंदना आदोडे, प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.