भर बाजारात दुकान लावण्यावरून सावत्र भावाचा खून; दोघांना जन्मठेपेची शिक्षा
By राजन मगरुळकर | Published: November 7, 2023 06:54 PM2023-11-07T18:54:40+5:302023-11-07T18:56:27+5:30
परभणी जिल्हा न्यायालयाचा निकाल: पंचवीस हजार प्रत्येकी दंड
परभणी : सावत्र भावास कोयत्याने मारून त्याचा खून केल्याच्या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच प्रत्येकी २५ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. हा निकाल परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश एस. एस.नायर यांनी मंगळवारी दिला आहे. परभणी शहरातील गुजरी बाजार भागात चार एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी नारायण लक्ष्मण आडणे व त्यांचा भाऊ सोमनाथ लक्ष्मण आडणे हे साखर गाठीचा व्यवसाय करतात. आरोपी नितीन आडणे व सचिन आडणे हे त्यांचे सावत्र भाऊ असून तीन एप्रिल २०१९ ला रात्री गुजरी बाजार येथे लाकडी टेबल लावण्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यावेळेस आरोपीने फिर्यादी व त्याच्या भावास धमकी दिली होती. यानंतर फिर्यादीने दोघांची समजूत घालून भांडण मिटविले होते. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी चार एप्रिलला मयत सोमनाथ आडणे हा त्याच्या ऑटोमध्ये साखरगाठी टाकून विक्री करण्यासाठी गुजरी बाजार येथील टेबल जवळ आला असता त्याच्या पाठोपाठ त्याची आई गंगाबाई लक्ष्मण आडणे यादेखील तेथे आल्या. सोमनाथ टेबलवर गाठ्या लावताना दोघे आरोपी दुचाकीवर आले. त्यांनी मास कापण्याचे सतुर सोबत आणले होते. नितीन आडणे याने सोमनाथ याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. यानंतर सचिन याने ते सतुर घेऊन सोमनाथ याच्यावर अनेक वार केले तसेच सिमेंटचा दगड व विटांनी डोक्यात मारहाण केली. यामध्ये मयताची आई ही घटनास्थळ परिसरात आरडाओरड करीत होती. जमलेल्या नागरिकांनी ऑटोत टाकून उपचारासाठी सरकारी दवाखान्यात सोमनाथ यास दाखल केले होते. परंतू, उपचारापूर्वीच तो मयत झाला होता. या घटनेत नारायण आडणे यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्याकडे तपास होता. यामध्ये तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. मयताची आई गंगाबाई व ऑटोमध्ये टाकून नेणारा चालक यांनी न्यायालयासमोर घडलेली घटना नमूद केली. मात्र, ऑटो चालक यामध्ये फितूर झाला.
२५ हजार रुपये दंडाची शिक्षा
जिल्हा न्यायाधीश एस.एस.नायर यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांनी खटला चालविला. अंतिम युक्तीवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपीचा खून करण्याचा उद्देश होता व टेबल लावण्याचा कारणावरून खून केला हे सिद्ध केले तसेच प्रत्यक्ष साक्षीदार ही नैसर्गिक साक्षीदार आहे, त्यामुळे तिची साक्ष विश्वासार्ह आहे, असे सांगितले. अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने मंगळवारी खटल्याचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच दंड न भरल्यास दोन वर्ष कारावास अशी शिक्षा सुनावली.
यांनी पाहिले काम
या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांनी बाजू मांडली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी मदत केली. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, सुरेश चव्हाण, शिवाजी भांगे, दत्तराव खुणे व पैरवी अंमलदार यांनी मदत केली.