परभणी येथे राष्ट्रीय लोक अदालत: सामोपचाराने वाद मिटविण्यासाठीच लोकन्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:26 AM2017-12-10T00:26:38+5:302017-12-10T00:26:49+5:30
न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याचा निकाल कोणाच्या तरी एकाच्या बाजुने लागतो. त्यामुळे उगीचच मनामध्ये द्वेष बाळगण्यापेक्षा लोक न्यायालयाच्या माध्यमातून सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी पक्षकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा उर्मिला जोशी- फलके यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याचा निकाल कोणाच्या तरी एकाच्या बाजुने लागतो. त्यामुळे उगीचच मनामध्ये द्वेष बाळगण्यापेक्षा लोक न्यायालयाच्या माध्यमातून सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी पक्षकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा उर्मिला जोशी- फलके यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
परभणी येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्या. उर्मिला जोशी या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश आर.एम. सादरानी, दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शेख अकबर शेख जाफर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.एस.एल.बागल, जिल्हा सरकारी वकील अॅड. दीपक गांजापूरकर, ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश उर्मिला जोशी म्हणाल्या की, लोकन्यायालयाच्या माध्यमातून शिष्टाई करण्याचे काम केले जाते. महत्वाकांक्षा प्रत्येकाच्याच असतात. न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांपैकी कोणताही निकाल एका बाजुने लागत असतो. त्यामुळे मनामध्ये द्वेष बाळगण्यापेक्षा व आपसात भांडण न करता पक्षकारांनी लोकन्यायालयाच्या माध्यमातून समोपचाराने वाद मिटवावेत, जेणेकरुन यासाठी लागणारा पैसा व वेळ वाचेल. वाचलेला वेळ सत्कार्यासाठी वापरता येईल. लोकन्यायालयात जमीन अधिग्रहणासंदर्भात बहुतांश खटले दाखल होतात. यामध्ये १०-१० वर्षे न्यायालयीन लढाई करत बसण्यापेक्षा व १० वर्षांनंतर पैसे मिळण्यापेक्षा आताच चार पैसे कमी मिळाले तरी तडजोड करुन सामंजस्याची भूमिका घेऊन वाद मिटवावा व लवचिकता बाळगावी. शिवाय पती-पत्नीमधील वाद, धनादेशाचा अनादर आदी प्रकरणातही वेळ आणि पैसा वाया घालण्यापेक्षा लोकन्यायालयातून हे वाद मिटवावेत. जेणेकरुन दोन पक्षकारांमधील आपसातील संबंध दृढ होतील, असेही त्या म्हणाल्या. यावेळी न्या.आर.एम. सादरानी यांनीही तणावमुक्त जीवन जगण्यासाठी पक्षकारांनी सामंजस्याने लोकन्यायालयाच्या माध्यमातून वाद मिटवावेत, असे आवाहन केले. लोकन्यायालयाचा दोन्ही पक्षकारांनी फायदा घ्यावा, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास न्या. एस.जी. ठुबे, न्या. डी.व्ही.कश्यप, न्या. एस.ए. श्रीखंडे, न्या. एम.एस. तिवारी, न्या.आर.एस. पाजणकर, न्या.सौ.एम.डी.कश्यप आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह दिवाणी न्यायाधीश अजय लांजेवार यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे माधव हुंबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक पी.बी.काळे, सेवानिवृत्त अधीक्षक एस.डी. पाटील, अधीक्षक डी.एन. कुंटुरकर, वरिष्ठ लिपीक बी.एस. कोत्तावार, कनिष्ठ लिपीक जी.के.चव्हाण यांनी प्रयत्न केले.
४ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम वसूल
४शनिवारी झालेल्या लोक न्यायालयात ५९२ प्रलंबित प्रकरणे व १६४ दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण ७५६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये ४ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. त्यामुळे या लोकन्यायालयाचा प्रकरणे निकाली काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे.