परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कार्यशाळा :काढणी पश्चात तंत्रज्ञानावर भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:06 AM2019-02-24T00:06:41+5:302019-02-24T00:07:12+5:30
भारतात फळ पिकांच्या उत्पादनाबरोबरच त्यांची नासाडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. उत्पादित फळ पिकांच्या तुलनेत ३० टक्के नासाडी होते. त्यामुळे ही फळ पिके जास्तीत जास्त काळ टिकविण्यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञान अधिक विकसित होणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञांनी या मुद्यावर भर देऊन संशोधन करावे, असे आवाहन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक डॉ.डब्ल्यू. एस.धिल्लन यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: भारतात फळ पिकांच्या उत्पादनाबरोबरच त्यांची नासाडी होण्याचे प्रमाण अधिक आहे. उत्पादित फळ पिकांच्या तुलनेत ३० टक्के नासाडी होते. त्यामुळे ही फळ पिके जास्तीत जास्त काळ टिकविण्यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञान अधिक विकसित होणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञांनी या मुद्यावर भर देऊन संशोधन करावे, असे आवाहन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक डॉ.डब्ल्यू. एस.धिल्लन यांनी केले.
भारतीय कृषी संशोधन परिषद, कोरडवाहू फळे मध्यवर्ती संशोधन संस्था बिकानेर आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कोरडवाहू फळे संशोधनावरील राष्ट्रीय कार्यशाळेला २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ढिल्लन बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवन तर प्रमुख पाहुणे म्हणून बिकानेर येथील प्रकल्प समन्वयक डी.डी.शर्मा, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ.प्रदीप इंगोले, डॉ.गोविंद मुंडे, डॉ.व्ही.एस. खंदारे, कुलसचिव रणजीत पाटील, प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख आदींची उपस्थिती होती.
डॉ.धिल्लन म्हणाले, देशात ६० टक्के नागरिक शाकाहारी आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षा ही महत्त्वाची बाब आहे. अन्न सुरक्षेसाठी मूबलक प्रमाणात संशोधन झाले आहे. अन्न सुरक्षेच्या अनुषंगाने पाऊले उचलली जातात. त्याच बरोबर पोषण सुरक्षा महत्त्वाची आहे. देशामध्ये फळ पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र जगाशी तुलना करता भारतात पोषणाच्या दृष्टीने फळांचा आहार घेण्याचे प्रमाण कमी आहे. शेती क्षेत्रातील उत्पन्नाचा आलेख चढता आहे. त्यामध्ये फळ पीक व भाजीपाल्यांची वाढ ५ टक्के एवढी आहे. तर शेती क्षेत्राची २ ते २.३ टक्के एवढी आहे. त्यामुळे फळ पिकांमध्ये महत्वपूर्ण संशोधन घेणे आवश्यक आहे. उत्पादन वाढले असले तरी आजही अनेक फळांची आयात करावी लागते. देशातील वातावरणाची स्थिती लक्षात घेऊन कोरडवाहू फळांच्या संशोधनावर शास्त्रज्ञांनी भर दिला पाहिजे. फळ पिकांचे उत्पादन वाढविण्यापेक्षा दर्जा वाढविण्यावर शास्त्रज्ञांनी भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
फळ पिकांच्या तंत्रज्ञान विकासासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान विकसित करताना अडचणी येतात. तेव्हा तंत्रज्ञान विकासासाठी लागणारा कालावधी कमी करुन संशोधित केलेले तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कोरडवाहू फळ पीक तंत्रज्ञानाचे विस्तारकार्य सद्यस्थितीला मर्यादित स्वरुपाचे आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी विस्तारकार्यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा. दुष्काळाशी सामना करणारे पिकांचे तंत्रज्ञान विकसित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ.विणा भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.जी.एस. खंदारे यांनी आभार मानले. संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांनी प्रास्ताविक केले. तीन दिवस चालणाºया या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये देशभरातून सुमारे ७० शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत.
४कोरडवाहू देशभरातील संशोधनांचा घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या कोरडवाहू फळ पिकांवरील राष्टÑीय स्तरावरील कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रामध्ये देशभरात कोरडवाहू फळ पिकांवर वर्षभरात झालेल्या संशोधनांचा आढावा घेण्यात आला.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात भारतीय कृषी संशोधन परिषद, कोरडवाहू फळे मध्यवर्ती संशोधन संस्था बिकानेर आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने कोरडवाहू फळे संशोधनावरील राष्ट्रीय कार्यशाळेला सुरुवात झाली आहे. उद्घाटनानंतर वेगवेगळ्या सत्रांमध्ये विविध विषयांवर चर्चा होत आहे. पहिलेच चर्चासत्र संशोधनाच्या अनुषंगाने पार पडले. देशभरातील फळ पिकांच्या संशोधनावर कार्य करणाºया १६ केंद्रांमधील संशोधनाचा आढावा घेण्यात आला. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक डॉ.डब्ल्यू. एस.धिल्लन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात बिकानेर येथील डॉ.बी.डी. शर्मा, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या चर्चासत्रामध्ये १० राज्यांमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. त्यानंतर पुढील वर्षी घ्यावयाच्या संशोधनासंदर्भातही चर्चा करण्यात आली.
फळ पिकांत जीवनमान उंचावण्याची क्षमता -ढवन
४मराठवाड्यामध्ये फळ पिकांच्या उत्पादनाबरोबरच प्रक्रिया उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध आहे. फळ पिकांच्या उत्पादन तसेच रोपवाटिका, काढणी पश्चात तंत्रज्ञान या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे संशोधकांनी या दृष्टीने काम करावे. फळ पीक उत्पादनामध्ये शेतकºयांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता आहे. मराठवाडा क्षेत्रात मागील वर्षांपासून सातत्याने निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन अनेक बागायतदार शेतकºयांना फळबागा जगवितांना अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे या शेतकºयांनी कोरडवाहू फळ पिकांना पसंती दिली आहे. ज्यामध्ये सीताफळ, डाळिंब, बोर, आवळा या पिकांचे उत्पादन घेतले जाते. या फळ पिकांसाठी मराठवाड्यामध्ये दर्जेदार रोपवाटिकांची उणीव आजही भासत आहे. ही उणीव दूर करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्याच प्रमाणे लागवड खर्च कमी करणारे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर माजी कुलगुरु डॉ.तुकाराम मोरे म्हणाले, कोरडवाहू फळ पिकांमुळे राज्यात येत्या काळामध्ये दुसरी हरित क्रांती होणे शक्य आहे.
चांगल्या वाणांचे संशोधन कराफळ पिकांच्या कार्यशाळेमध्ये दुसºया सत्रात वनस्पती पैैदास संशोधन व्यवस्थापन या विषयावर तांत्रिक चर्चासत्र पार पडले. अध्यक्षस्थानी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे तर उपाध्यक्ष म्हणून डॉ.जी.एम.वाघमारे उपस्थित होते. या चर्चासत्रामध्ये फळ पिकासंदर्भात देशभरात केलेले सर्व्हेक्षण, देशात उपलब्ध असलेले वाणांचे प्रकार, कमी पाण्यावर येणारे वाण आदी बाबींवर चर्चा झाली. देशभरातून चांगल्या दर्जेदार वाणांचे संशोधन करुन हे वाण विकसित करण्याचा सूर या चर्चासत्रातून शास्त्रज्ञांनी बोलून दाखविला.