शिवसेनेच्या वर्चस्वाला राष्ट्रवादीचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:54 AM2019-04-03T07:54:46+5:302019-04-03T12:09:45+5:30
तिरंगी लढत । वंचित बहुजन आघाडीची एंट्री दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी
परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी काँग्रेसने कडवे आव्हान दिले असून, वंचित बहुजन आघाडीची एंट्री युती- आघाडीसाठी डोकेदुखी ठरली आहे़ परभणी लोकसभा मतदार संघात १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत़ त्यामध्ये शिवसेनेकडून विद्यमान खा़ संजय जाधव तर राष्ट्रवादीकडून माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान यांचा समावेश आहे़
या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच तिरंगी लढत होत आहे़ परभणी लोकसभा मतदार संघावर १९९१ पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे़ या वर्चस्वाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण चेहरा देऊन शिवसेनेसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे़ त्यामुळे आपला गड शाबू राखण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना चांगलाच आटापिटा करावा लागत आहे़
परभणीचे सेनेचेच आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यासोबत त्यांचे टोकाचे मतभेद होते़ ते मातोश्रीवर निवडणुकीपूर्वीच मिटल्याचे सांगण्यात येत आहे़ शिवाय पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे व सध्या भाजपात असलेले पाथरीचे आ़ मोहन फड यांच्यासोबतही खा़ जाधव यांचे तीव्र मतभेद होते़ खा़ जाधव यांच्यामुळेच आ़ फड यांनी शिवसेना सोडली होती़ आता तेही युतीसोबत असल्याचे खा़ जाधव सांगत आहेत़ परंतु, विरोधक मात्र जाधव यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांच्यापासून सर्वचजण दूर गेल्याचे सांगत आहेत़ दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या पाठीशी ५ आमदार, ४ माजी खासदार, ४ माजी आमदार यांचे पाठबळ आहे़ शिवाय त्यांच्याकडून प्रत्यक्ष मैदानात व सोशल मीडियातही आक्रमक पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविली जात आहे़
आतापर्यंत चार वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेने पराभव केल्याने या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्नही राष्ट्रवादीकडून सुरू आहे़ परभणी हे चळवळीचे केंद्र असून, येथे अॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्या आचारसंहितेपूर्वी दोन वेळा झालेल्या सभांना मोठी गर्दी झाली होती़ त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या मतपेटीला धक्का पोहचविण्याचे काम वंचित आघाडीकडून होवू शकते़ त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांची भीती वाटू लागली आहे़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून गेल्या पाच वर्षांत अनेक विकासात्मक निर्णय घेण्यात आल्याने मतदार खूष आहेत़ त्यामुळे विरोधकांनी कितीही खटाटोप केला तरी जनता आमच्या पाठीशी आहे़ परिणामी शिवसेनेचा गड कालही शाबूत होता, आजही आहे व तो भविष्यातही राहील़
- संजय जाधव, शिवसेना
शिवसेनेने गेल्या ३० वर्षांत फक्त धार्मिक मुद्यांच्या आधारे निवडणूक लढवून सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे़ त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघाचा विकास खुंटला आहे़ आता या पक्षाच्या भूलथापांना सुजान मतदार भीक घालणार नाही़ विकासासाठी ते राष्ट्रवादीला साथ देणार आहेत़
- राजेश विटेकर, राष्ट्रवादी
कळीचे मुद्दे
शिवसेना-भाजपा युती व राष्ट्रवादी-काँग्रेस या दोन्ही पक्षांतील अंतर्गत मतभेद अद्यापही मिटलेले नाहीत़
युती व आघाडीचे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असले तरी प्रचारात आता पोट जातीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे़
प्रमुख उमेदवार
संजय जाधव । शिवसेना
राजेश विटेकर । राष्ट्रवादी
आलमगीर खान । वंबआ