पालमच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंगल सिरस्कर बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 06:08 PM2022-02-11T18:08:02+5:302022-02-11T18:20:02+5:30
राष्ट्रवादीच्या 10 नगरसेवकांसह एका अपक्षाने नगराध्यक्षाला पाठींबा दिला.
पालम ः अपेक्षेप्रमाणे पालम नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंगलबाई वसंतराव सिरस्कर तर उपनगराध्यक्षपदी पठाण अनवरीबी हिदायतुल्लाखाँ यांची अविरोध निवड झाली. दोन्ही पदासांठी प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने शुक्रवारी (ता.11) दुपारपर्यंत निवडीची विशेषसभा आटोपली. विशेषतः राष्ट्रीय समाज पक्ष, भाजप आणि एक अपक्ष मिळून 6 सदस्य बैठकीला अनुपस्थित राहिले. तर राष्ट्रवादीच्या 10 नगरसेवकांसह एका अपक्षाने नगराध्यक्षाला पाठींबा दिला.
पालम नगरपंचायत निवडणूकीत 17 पैकी 10 जाग्यांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला आहे. बहूमतासाठी राष्ट्रवादीला 9 सदस्यांची आवश्यक होती. तरीही गत पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे ऐनवेळी गडबड होऊ नये, म्हणून राष्ट्रवादीने नगरसेवकांना सहलीवर नेले होते. दरम्यान, नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात 4 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मुदत दिली होती. दिवसभरात राष्ट्रवादीकडून मंगलबाई सिरस्कर यांचा एकमेव अर्ज आला होता. तेव्हांच राष्ट्रावादीने फटाके फोडले होते. परंतु अध्यक्षांसह उपनगराध्यक्षांच्या निवडीसाठी 11 फेब्रवारी रोजी विशेषसभा बोलावली होती. त्यात नगराध्यक्षाप्रमाणेच उपनगराध्यक्षसाठी राष्ट्रवादीकडून पठाण अनवरीबी हिदायतुल्लाखाँ यांचा एकमेव अर्ज आला. अन्य कोणीही उमेदवारी दाखल केला नाही. त्यांना राष्ट्रवादीचे 10 आणि एका अपक्ष मिळून 11 सदस्यांनी पाठींबा दर्शविला.
यानंतर निर्वाचन अधिकारी सुधीर पाटील, निवडणूक अधिकारी संतोष लोमटे यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. विशेषसभेला राष्ट्रवादीचे गटनेते भास्कर गंगाराम सिरस्कर, संजय रामराव थिट्टे, रजिया बेगम सय्यद इफ्तेखार सय्यद, सरस्वती ज्ञानराज घोरपडे, गौसिया अबुदबीन चाऊस, सरस्वती सदाशिव सिरस्कर, कैलास रामराव रूद्रवार, गजानन आबासाहेब पवार आणि अपक्ष धुरपताबाई विश्वनाथ हिवरे यांची उपस्थिती होती. निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आऩंदोत्सव साजरा केला.