परभणी जि.प.मध्ये राष्ट्रवादीतील फूट टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:28 AM2018-01-09T00:28:10+5:302018-01-09T00:28:25+5:30
जिल्हा परिषदेत काँग्रेस- शिवसेनेच्या सदस्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर काही दिवसांपूर्वी टीका केली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही अंतर्गत वाद सोमवारी चव्हाट्यावर आला. राकाँचे गटनेते अजय चौधरी यांना बदलण्यावरुन या पक्षामध्ये दोन गट पडून निर्माण झालेला वाद तिन्ही आमदारांच्या मध्यस्थीनंतर तुर्त निवळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेत काँग्रेस- शिवसेनेच्या सदस्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर काही दिवसांपूर्वी टीका केली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही अंतर्गत वाद सोमवारी चव्हाट्यावर आला. राकाँचे गटनेते अजय चौधरी यांना बदलण्यावरुन या पक्षामध्ये दोन गट पडून निर्माण झालेला वाद तिन्ही आमदारांच्या मध्यस्थीनंतर तुर्त निवळला आहे.
जिल्हा परिषदेत निधी वाटपावरुन शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे गटनेते राम खराबे, काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास जोगदंड, जि.प.सदस्य बाळासाहेब रेंगे, बाजार समितीचे माजी सभापती गणेश घाटगे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन निधी वाटपात विरोधी पक्षाच्या सदस्यांवर अन्याय झाला असल्याचा आरोप केला होता. काँग्रेस- शिवसेनेसह सत्ताधारी राष्ट्रवादीमधील सदस्यही निधी वाटपावरुन नाराज असल्याचे या सदस्यांनी यावेळी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिवसभर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याची चर्चा होती. जि.प.मध्ये राष्ट्रवादीचे २४ सदस्य आहेत. त्यापैकी नाराज १३ सदस्यांनी वेगळा गट स्थापन करुन जिल्हाधिकाºयांची भेट घेण्याची तयारी केली. या अनुषंगाने स्वतंत्रपणे सभागृहात वेगळा गट स्थापन करता येतो का? याची चाचपणी केली. स्टेशनरोडवरील एका सभापतींच्या निवासस्थानी दुसºया गटातील सदस्यांची जवळपास तीन तास बैठक झाली. या बैठकीस जि.प.सदस्य राजेंद्र लहाने, माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे, प्रसाद बुधवंत आदींची उपस्थिती असल्याचे समजले. या बैठकीत राष्ट्रवादीचे गटनेते अजय चौधरी यांच्या कामकाजाविषयी संताप व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादीच्या अन्य सदस्यांना विश्वासात न घेता चौधरी मनमानी पद्धतीने निर्णय घेत आहेत, स्वत:च्या गावासाठी तब्बल साडे पाच कोटी रुपयांचा निधी घेतला अन् इतर सदस्यांवर अन्याय केला गेला, अशीही भावना काहींनी बोलून दाखविली. याबाबतची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे जि.प.तील अन्य पदाधिकारी व सभापती बैठकस्थळी दाखल झाले. त्यानंतर आ.विजय भांबळे, आ.मधुसूदन केंद्रे व जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी नाराज सदस्यांशी फोनवर चर्चा केली. त्यावेळी नाराज सदस्यांनी गटनेते चौधरी यांच्या कामकाजाविषयी आक्षेप नोंदविले. त्यामध्ये चौधरी राकाँच्याच सदस्यांचे ऐकत नाहीत, परस्पर विषय मंजूर करुन घेतात, त्यामुळे इतर सदस्यांवर अन्याय होत आहे. आमची अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर कोणत्याही सभापतींविषयी नाराजी नाही. फक्त आमचे म्हणणे मांडण्यासाठी आमचा गटनेता निवडायचा आहे, असे सांगितले. यावर तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीमधील सदस्यांचा अंतर्गत वाद योग्य नाही. यामुळे चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाईल. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. गटनेता बदलण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या पूर्व संध्येला नवीन गट स्थापने योग्य होणार नाही, असे सांगितले, असल्याची सुत्रांनी माहिती दिली. शिवाय उपस्थित इतर पदाधिकाºयांनीही नाराज सदस्यांना विश्वासात घेतले जाईल व त्यांची मागणी पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच नाराज सदस्यांच्या निधी वाटपात बदल करुन दिले जातील, असे सांगितले. त्यानंतर नाराज सदस्यांनी दोन ऐवजी चार दिवस घ्या, पण गटनेता बदला व निधी वितणात बदल करुन द्या, अशी मागणी केली व वरिष्ठांच्या शब्दांचा मान राखून माघार घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ही बैठक संपली. त्यामुळे राष्ट्रवादीतील वाद तुर्तास तरी मिटला आहे. पुढील चार दिवस पक्षाचा गटनेता बदलतो की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
आजच्या सर्वसाधारण सभेकडे जिल्ह्याचे लक्ष
जिल्हा परिषदेची मंगळवारी दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभा होत आहे. या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांकडून विविध मुद्दे उपस्थित करुन सत्ताधाºयांना खिंडीत गाठण्याची तयारी करण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सर्वसाधारण सभेत प्रसारमाध्यमांना प्रवेश देण्याची मागणी
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाºयांकडून सातत्याने प्रसारमाध्यमांना प्रवेश न देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. सभागृहातील अंतर्गत हितसंबंधाच्या आर्थिक बाबींची सभागृहाबाहेर चर्चा होेऊ नये, म्हणून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सभागृहात नको, अशी भूमिका गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाºयांनी घेतली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षाच्या सदस्यांनीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सभागृहात प्रवेश देण्याची मागणी जि.प.अध्यक्ष व मुख्यकार्यकारी अधिकाºयांकडे केली आहे.
४या संदर्भात मंगळवारी काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास जोगदंड, जि.प.सदस्य बाळासाहेब रेंगे पाटील, शोभाताई रामभाऊ घाटगे यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये पत्रकारांच्या प्रवेशाबरोबरच सर्वसाधारण सभेचे कामकाज इन कॅमेरा करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या काही सदस्यांची भूमिका मवाळ
गेल्या आठवड्यात सत्ताधारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांविरुद्ध आक्रमक भूमिका घेणाºया शिवसेनेच्या काही सदस्यांनी आता मवाळ भूमिका घेतली असल्याचे समजते. यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. मवाळ भूमिका घेणारे सदस्य कोण याचीही चर्चा जि.प.च्या वर्तूळात मंगळवारी दिवसभर होती.