कामात निष्काळजीपणा भोवला;  साहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 03:39 PM2021-03-13T15:39:09+5:302021-03-13T15:43:35+5:30

जिंतूर येथील साहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचाऱ्यांवर कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे.

Negligence at work; Four employees, including an assistant engineer, suspended | कामात निष्काळजीपणा भोवला;  साहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचारी निलंबित

कामात निष्काळजीपणा भोवला;  साहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचारी निलंबित

Next
ठळक मुद्दे चारठाणा येथील अनधिकृत वीज वापर प्रकरणसहा जणांची परभणी मंडळाबाहेर बदली

परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा भागात सॉ मील व पिठाच्या गिरणीत अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू असल्याप्रकरणी गिरणी चालकावर फौजदारी गुन्हा व जिंतूर येथील साहाय्यक अभियंत्यासह चार कर्मचाऱ्यांवर कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयाच्या पाच पथकांनी १० मार्च रोजी परभणी जिल्ह्यात थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची फेरतपासणी केली. यामध्ये जिंतूर येथे शाखा कार्यालयांतर्गत येणाऱ्या चारठाणा भागात सॉ मील व पिठाण्या गिरणीत अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू होता. या प्रकरणी गिरणी चालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चारठाणासह पाचलेगाव येथे अनधिकृतपणे आकडे घेऊन विजेचा वापर सुरू असल्याचे या पथकाला दिसून आले. त्यामुळे या प्रकरणी त्वरित पंचनामा न करणे, वीजपुरवठा खंडित न करणे व गुन्हा नोंद न करणे आदीबाबत महावितरणचे साहाय्यक अभियंता विनायक उत्तमराव डिग्रसकर यांना अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांनी निलंबित केले. तसेच वीजबिल वसुलीत दुर्लक्ष केल्याप्रकरणी प्रधान तंत्रज्ञ आत्माराम दत्तराव ननवरे, वरिष्ठ तंत्रज्ञ अब्दुल रहेमान अब्दुल हमीद, विद्युत साहाय्यक खुशाल ज्ञानदेव कऱ्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

सहा जणांची परभणी मंडळाबाहेर बदली
गंगाखेड, जिंतूर व बामणी येथे वीज बिलाच्या तक्रारीची दखल न घेणे, वीजबिल दुरुस्त न करणे, त्याचबरोबर प्रशासकीय कामात अनियमिततेचा ठपका ठेवून गंगाखेड ग्रामीण शाखा तंत्रज्ञ साहेबराव विनायकराव पवार, विनोद भारत गुरव, जिंतूर उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ बजरंग सखाराम साबळे, सुरेश पांडुरंग तारू, सुरेश साहेबराव खंदारे, तंत्रज्ञ नरेश बनपुरे यांची परभणी मंडळाबाहेर बदली करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना
जिल्ह्यात औरंगाबाद येथील महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाकडून ग्रामीण भागात वीजपुरवठ्यासंदर्भात पाहणी करण्यात आली. याबाबत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे वीजपुरवठा सुरूच असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे काही जणांना दोषी धरून निलंबित तर काही जणांची बदली करण्यात आली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवर अधिक नियंत्रण ठेवण्याच्या सूचना परभणी येथील अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांना प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.
..............
 

Web Title: Negligence at work; Four employees, including an assistant engineer, suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.