नवीन आरोग्य संस्था मंजुरीचा आराखडा तयार करणे सुरू- राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:19 AM2021-03-09T04:19:55+5:302021-03-09T04:19:55+5:30
परभणी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्रे आदींमध्ये निकषाप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली ...
परभणी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्रे आदींमध्ये निकषाप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली नसल्याने विद्यमान आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात पदनिर्मिती व रिक्त पदे भरण्याचा अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने काय कार्यवाही सुरू आहे? असा तारांकित प्रश्न आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. या प्रश्नावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे, परभणी जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या मंजूर आकृतिबंधानुसार गट अ ते गट ड संवर्गातील काही पदे रिक्त आहेत. तथापि, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तसेच कंत्राटी तत्त्वावर रिक्त पदे भरण्यात येऊन आरोग्य सेवा सुरळीत देण्यात येत आहे. जिल्ह्यांच्या मंजूर बृहत आराखड्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. सुधारित लोकसंख्येच्या आधारे नवीन संस्था मंजुरीचा जोड बृहत आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच काही मंजूर आरोग्य संस्थांचे संवर्धन करण्यात आले आहे. आरोग्य संस्थांच्या प्रकारानुसार संबंधित आरोग्य संस्थेचा पदाचा आकृतिबंध निश्चित केला आहे. सद्य:स्थितीत परभणी जिल्ह्यात ४०६ खाटांचे जिल्हा रुग्णालय, ६० खाटांचे स्त्री रुग्णालय (श्रेणीवर्धन मान्य करून १०० खाटांचे केले आहे.) ५० खाटांची २ उपजिल्हा रुग्णालये, ३० खाटांची सात ग्रामीण रुग्णालये, त्यापैकी मानवत येथील रुग्णालयाचे श्रीवर्धन करून ५० खाटांच्या रुग्णालयास मान्यता देण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील गट क व गट ड ची पदे संबधित जिल्हा परिषदेकडून भरण्यात येतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने गट अ चे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व उर्वरित पदांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर पदभरती करून पदस्थापना देण्यात येत आहे, असेही टोपे म्हणाले.