परभणीकरांसाठी पुढील तीन दिवस तापदायकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:58 PM2019-05-26T23:58:24+5:302019-05-26T23:58:51+5:30
मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यातील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली असून, वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आगामी तीन दिवस तापदायक ठरणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यातील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली असून, वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आगामी तीन दिवस तापदायक ठरणार आहे़
परभणी जिल्ह्यात यावर्षी मार्च महिन्यापासून तापमान वाढले आहे़ सलग तीन महिने काही दिवसांचा अपवाद वगळता परभणी जिल्ह्याचा पारा ४० अंशापेक्षा अधिक राहिला आहे़ त्यामुळे नागरिक उन्हाने त्रस्त झाले आहेत़ मे महिन्यातच पावसाची प्रतीक्षा लागली असतानाच भारतीय हवामान खात्याने परभणी जिल्ह्यात २८ मेपर्यंत उष्णतेची लाट येऊन तापमान वाढण्याची शक्यता वर्तविली आहे़ त्यामुळे जिल्हावासियांना पुढील आठवड्यातही वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार आहे़ यावर्षी जिल्ह्यात विक्रमी ४७़३ अंश तापमानाची नोंद झाली आहे़ जिल्ह्याच्या ३० वर्षांच्या इतिहासातील हे सर्वाधिक तापमान ठरले़ त्यानंतर हळूहळू तापमान कमी होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र ती फोल ठरली़ सरत्या आठवड्यातही जिल्ह्याचा पारा ४३ ते ४४ अंशा दरम्यान राहिला़ रविवारी परभणी जिल्ह्यात ४४़२ अंश तापमानाची नोंद झाली आहे़ त्यातच हवामान खात्याने आणखी तापमान वाढण्याची शक्यता वर्तविली़ त्यामुळे येत्या काळातही नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे़ रविवारी सकाळपासूनच तापमानात मोठी वाढ झाली होती़ कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळाला़
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
४हवामान खात्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़
४शक्यतो उन्हात फिरण्याचे टाळावे, सुती कपडे वापरावेत, उष्ण पेय घेऊ नये, भरपूर पाणी प्यावे, शरिरातील क्षारांची कमी भरून काढण्यासाठी लिंबू पाणी आणि मिठ घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले केले आहे़
कृषी विद्यापीठाचा अंदाज
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवेनेही आगामी काळात तापमान वाढण्याची शक्यता वर्तविली आहे़ २७, २८ आणि २९ असे तीनही दिवस कमाल तापमान ४४ अंशापर्यंत तर किमान तापमान २९ अंशापर्यत राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे़