दुचाकीस्वाराच्या ताब्यातून नऊ किलो गांजा जप्त
By राजन मगरुळकर | Published: January 14, 2024 05:17 PM2024-01-14T17:17:01+5:302024-01-14T17:17:24+5:30
परभणी : गांजा या अंमली पदार्थाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना एका दुचाकीस्वारावर कारवाई करण्यात आली. यामध्ये ...
परभणी : गांजा या अंमली पदार्थाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना एका दुचाकीस्वारावर कारवाई करण्यात आली. यामध्ये नायलॉन पोत्यात नऊ किलो गांजा आढळला. ही प्रकार गंगाखेड ते कोद्री राज्य रस्त्यावर शनिवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आला. यामध्ये दुचाकीसह गांजा असा एकूण एक लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गांजाच्या अवैधरित्या होणाऱ्या वाहतुकीची माहिती पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी गंगाखेड ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार केले. या दोन्ही पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले. यात शनिवारी रात्री गंगाखेड ते कोद्री रस्त्यावर दूचाकी क्रं (एमएच १४ सीए २५७९) दुचाकीस्वाराला पथकाने अडवले. या दुचाकीवर नायलॉन पोत्यामध्ये नऊ किलो तपकिरी, हिरवट रंगाचा काड्या मिश्रित गांजा आढळला. ज्याची किंमत एक लाख आठ हजार रुपये एवढी आहे. सोबत २० हजारांची दुचाकी असा एकूण एक लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त करून अर्जुन मनोहर मुंढे (५१, रा.कोद्री, ता.गंगाखेड) याच्याविरुद्ध गंगाखेड ठाण्यात सपोनि.सिद्धार्थ इंगळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गडदे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, सिध्दार्थ इंगळे, कर्मचारी राहुल परसोडे, सचिन भदर्गे, परसराम गायकवाड, कैलास केंद्रे, हनुमान ढगे, रंगनाथ दुधाटे, सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, जयश्री आव्हाड, संजय घुगे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी केली.