बोरी येथील नऊ भाजीपाला विक्रेत्यांना ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:20 AM2021-03-09T04:20:11+5:302021-03-09T04:20:11+5:30
बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मार्च रोजी सोमवारी आठवडी बाजाराच्या दिवशी नऊ भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात ...
बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मार्च रोजी सोमवारी आठवडी बाजाराच्या दिवशी नऊ भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून साडेचार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सोळंके यांनी दिली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १५ मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, असे असतानाही जिंतूर तालुक्यातील बोरी येथे भाजीपाला विक्रेते सोमवारी आठवडी बाजारात दाखल झाले होते. या भाजीपाला विक्रेत्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार सूचना देऊनही हे वि्क्रेते ८ मार्चला सकाळी गावात दाखल होत भाजीपाला विक्री करू लागले. ग्रामपंचायतीच्या वतीने भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रामविस्तार अधिकारी प्रल्हाद सोळंके यांनी एक पथक तयार केले होते. या पथकाच्या वतीने सोमवारी नऊ भाजीपाला विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करीत साडेचार हजार रुपयांचा दंड वसूल केला. या पथकात दत्ता चौधरी, राजू चौधरी, विजय चिमाणकर, कैलास डाके, ज्ञानेश्वर चालमोटे यांचा समावेश आहे.