नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने परभणीकरांची रस्त्यांची चिंता वाढली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:06 PM2018-09-21T17:06:51+5:302018-09-21T17:07:31+5:30

रस्ते बांधणीसाठी कंत्राटदारांना बँका कर्ज देण्यास नाखुष असून त्यांनी आखडता हात घेतला आहे. त्यामुळे या संदर्भातील प्रकल्प रेंगाळण्याची भिती आहे, असे वक्तव्य केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने उद्घाटन करण्यात आलेल्या जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लागेल की नाही, अशी परभणीकरांना चिंता वाटू लागली आहे. 

Nitin Gadkari's statement raised concerns about roads in Parbhani | नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने परभणीकरांची रस्त्यांची चिंता वाढली 

नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने परभणीकरांची रस्त्यांची चिंता वाढली 

Next

परभणी :  रस्ते बांधणीसाठी कंत्राटदारांना बँका कर्ज देण्यास नाखुष असून त्यांनी आखडता हात घेतला आहे. त्यामुळे या संदर्भातील प्रकल्प रेंगाळण्याची भिती आहे, असे वक्तव्य केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने उद्घाटन करण्यात आलेल्या जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा प्रश्न मार्गी लागेल की नाही, अशी परभणीकरांना चिंता वाटू लागली आहे. 

परभणी  येथे १९ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परभणी लोकसभा मतदारसंघातील तब्बल ३ हजार ४४९ कोटी रुपयांच्या रस्ता कामांचे ई-भूमिपूजन करण्यात आले होते.  यामध्ये पारवा ते असोला ५२२.८० कोटी, कोल्हा ते नसरतपूर २८१.७८ कोटी, वाटूरफाटा ते जिंतूर ५१४.१८ कोटी, जिंतूर ते परभणी ३५६.६६ कोटी, जिंतूर ते औंढा नागनाथ- वसमत-नांदेड २११.३४ कोटी, परभणी ते गंगाखेड २०२ कोटी, पाथरी ते सेलू ते देवगावफाटा २१८ कोटी, राज्य मार्ग २२२ परभणी शहर रस्ता व नाली बांधकाम २६.७६ कोटी, गंगाखेड- पालम-लोहा ६.२९ कोटी या परभणी जिल्ह्यातील रस्त्यासह लोकसभा मतदारसंघातील अन्य रस्ता कामांचा समावेश होता. शिवाय मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ७१ कोटी ४० लाख रुपयांच्या रस्ता कामाचेही ई-भूमिपूजन यावेळी गडकरी व फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात झालेल्या या भव्य समारंभाचा कार्यक्रम शासकीय असला तरी भाजपाच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सभेच्या व्यासपीठावरच आ.मोहन फड यांनी मागणी केल्यानंतर पाथरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी एका झटक्यात गडकरी यांनी मंजूर केला असल्याचे भाषणात सांगितले होते. त्यामुळे विकासापासून कोसोदूर असलेल्या परभणी जिल्हावासियांना रस्त्यांच्या दुरवस्थेचे दारिद्र्य संपेल, अशी आशा वाटली. दळणवळणाची साधने रस्त्यांमुळे नसल्याने मोठे उद्योग परभणीत येत नाहीत. आता खुद्द केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनीच निधी जाहीर केला म्हटल्यावर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असेही परभणीकरांना वाटू लागले. मंजूर केलेल्या रस्त्यांमधील काही ठिकाणच्या कामांना सुरुवातही झाली आहे; परंतु, मोठ्या रस्त्यांच्या कामांना म्हणावी तशी गती आलेली नाही.

अशातच गडकरी यांनी १९ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे एका कार्यक्रमात देशातील रस्ते बांधकामासाठी कंत्राटदारांना कर्ज देण्यास बँकांनी काहीसा अखडता हात घेतल्याने हे प्रकल्प रेंगाळण्याची भीती आहे, असे सांगितले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील मंजूर केलेले कोट्यवधी रुपयांचे प्रकल्पही रेंगाळतील की काय, अशी भीती परभणीकरांना वाटू लागली आहे. जिल्ह्याील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. शिवाय प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरुन वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत समजली जाते. विशेषत: परभणी- गंगाखेड, कोल्हा पाटी ते झिरो फाटा, परभणी ते जिंतूर या प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. 

२२२ राष्ट्रीय महामार्गावरील कामांना सुरुवात होईना
राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील कोल्हा पाटी ते झिरोफाटा या कामास तब्बल २८१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद दोन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. याकामाच्या निविदा काढून ते काम मुंबई येथील कंत्राटदारास सुटले; परंतु, सदरील कंत्राटदाराने हे काम सुरु केलेले नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या नांदेड कार्यालयाने या कंत्राटदारास वारंवार नोटिसा दिल्या, तरी कंत्राटदार या कार्यालयास दाद देण्यास तयार नाही. दुसरीकडे या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची कार्यवाहीही देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करु शकत नाही.  त्यामुळे हतबल झालेल्या या कार्यालयाने तुर्त या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणचे खड्डेही बुजविण्यात आले आहेत; परंतु, त्या कामाचा दर्जाही सुमार आहे. त्यामुळे पुन्हा खड्डे पडत आहेत.

Web Title: Nitin Gadkari's statement raised concerns about roads in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.