‘ना रक्त तपासणी, ना सोनोग्राफी’; ५० महिला थेट प्रसूतीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:58+5:302021-06-24T04:13:58+5:30
गरोदर मातांसाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंमलात आणून मातांची काळजी घेतली जात आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ...
गरोदर मातांसाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंमलात आणून मातांची काळजी घेतली जात आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीनेही प्रत्येक मातांची अंगणवाडीच्या माध्यमातून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात माता मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे.
२०२०-२१ या वर्षात ७ हजार २९४ माता जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्या. कोरोना काळात बाहेर पडणे मुश्कील झाल्याने केवळ ५० महिलांनी सोनाेग्राफी, नियमित तपासणी व डॉक्टरांचे सल्ले घेण्याकडे दुर्लक्ष करून थेट प्रसूतीसाठी दाखल झाल्याचे स्त्री रुग्णालयातून दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.
विशेष म्हणजे यातील ७३ मातांनी व्यंग असलेल्या बाळांना जन्म दिल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.
चाचणी आवश्यकच
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व जननी शिशू सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर मातांना जवळपास ५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. या पैशातून सोनाेग्राफी, नियमित तपासणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. त्यामुळे सुदृढ व निरोगी बाळासाठी नियमित तपासणी आवश्यक आहे.
सुदृढ व निरोगी बाळ जन्माला घालण्यासाठी गरोदरपणाच्या ९ महिन्यात चार ते पाच वेळा सोनोग्राफी केल्या जातात. त्यातूनच गर्भातील व्यंग दोष दिसून येतो. त्यामुळे नियमित तपासणी, सोनोग्राफी करणे गरजेचे आहे.
-डॉ. कालिदास चौधरी,
स्त्रीरोग तज्ज्ञ, परभणी