ना कॉल, ना ओटीपी, तरी बँकेतून पैसे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:53+5:302021-06-19T04:12:53+5:30
सोशल माध्यमाचे प्रमाण वाढल्याने सध्या प्रत्येकाच्या हातात अँन्ड्राँइड मोबाईल आहे. यातून अनेक गोष्टींची माहिती सहज मिळणे सोपे झाले आहे. ...
सोशल माध्यमाचे प्रमाण वाढल्याने सध्या प्रत्येकाच्या हातात अँन्ड्राँइड मोबाईल आहे. यातून अनेक गोष्टींची माहिती सहज मिळणे सोपे झाले आहे. तरुणाईसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रत्येक जण सोशल माध्यमावर कोरोनाच्या लाँकडाऊनपासून जास्त प्रमाणात सक्रीय राहत असल्याचे दिसून येते. यातच नवनवीन गोष्टी आत्मसात करताना तसेच मोबाईलमध्ये वेगवेगळ्या अँपला इन्स्टाँल करताना काही अँप्समुळे फसवणूक होत आहे. असे प्रकार अनेक दिवसांपासून अनेकांच्या बाबतीत घडले आहेत. डिजीटल पेमेंट करणारे अँप किंवा अन्य कोणतेही अँप मोबाईलमध्ये घेताना मोबाईलमधील आपल्या खासगी माहितीची चोरी करुन त्याद्वारे बँकेच्या खात्याची माहिती, वैयक्तिक फोटो तसेच आधार कार्ड, पँन कार्ड यांची गोपनीय माहिती काही वेळेला चोरी केली जाते. यातून मग कोणतीही माहिती आपल्याला मोबाईलवरुन न विचारता किंवा त्याचा ओटीपी न मागताही अनेकांच्या खात्यातील पैसे गायब झाल्याचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे आहे किंवा फसवणूक झाल्यास तक्रार देत समोर येणे गरजेचे आहे.