पिकविम्यासह अतिवृष्टीच्या अनुदानाची मागणी; गोदापात्रात स्वाभिमानीचे जलसमाधी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 16:35 IST2025-01-18T16:34:37+5:302025-01-18T16:35:00+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात करण्यात आले आंदोलन

पिकविम्यासह अतिवृष्टीच्या अनुदानाची मागणी; गोदापात्रात स्वाभिमानीचे जलसमाधी आंदोलन
- विनायक देसाई
पूर्णा ( जि. परभणी) : राज्य सरकारने विमा कंपनीला रक्कम दिलेली नाही. त्यामुळे विमा कंपनीने २०२४ खरीप हंगामातील विमा शेतकऱ्यांना दिला नाही. शिवाय अतिवृष्टी अनुदानाचीही प्रतिक्षा आहे. मात्र, याकडे लक्ष दिले जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी धानोरा काळे येथील गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले.
२०२४ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी झाली व शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले, त्यामुळे पिक विमा कंपनीने सर्वे करून शेतकऱ्यांना पिकविमा अग्रिम मंजूर केली. शासनाने अतिवृष्टीचे अनुदान मंजूर केले. नुकसान होवून दोन ते तीन महिने उलटून गेले तरी पिक विमा अग्रीम व शासनाची मदत शेतकन्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही. ती तात्काळ जमा करावी, नाफेड, सिसिआय अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची हेटाळणी थांबवावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गादावरी पात्रात जलसमाधी आंदोलन करून लक्ष वेधले. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडत नाही तोपर्यंत आंदाेलन सुरूच राहील असा पवित्रा घेतला.
यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, मुंजा लोढे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, नरसिंग पवार, नामदेव काळे, पंडित भोसले, कैलासराव काळे, विठ्ठल चौकट, रामा दुधाटे, नागेश दुधाटे, लक्ष्मण लांडे, विजय कोल्हे, अंगद काजळे, विष्णु शिंदे आदींनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रेस्क्यू पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. दरम्यान तहसीलदार यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरूच होता.