पाऊस नाही, कर्ज कसे फिटणार; आर्थिक विवंचनेत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2023 06:02 PM2023-08-12T18:02:54+5:302023-08-12T18:02:58+5:30
वाघाळा शिवारामध्ये १ हेक्टर ५५ गुंठे शेती असलेला शेतकरी होता आर्थिक विवंचनेत
पाथरी : शेती पिकाला पाण्याची कोणतीही सोय नसल्याने आणि बँकेचे कर्ज कसे फेडणार या विंवचनेत एका अल्पभुधारक शेतकर्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवार १२ ऑगस्ट रोजी तालुक्यातील वाघाळा येथे उघडकीस आली. बाबुराव योगाजी भंडारे (वय ५५ ) असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे.
बाबुराव भंडारे यांच्या नावे वाघाळा शिवारामध्ये गट क्रमांक २६३ मध्ये १ हेक्टर ५५ गुंठे शेती आहे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा पाथरी कडून सात वर्षा पूर्वी 97 हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. ते थकीत आहे. शेतामध्ये कॅनॉलच्या पाण्यावर उसाची लागवड केलेली असून मागील काही दिवसापासून पावसाचा खंड आहे. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील ऊस वाळत आहे.
दरम्यान, शुक्रवारी शेतात जातो म्हणून बाबुराव घराबाहेर गेले परंतु परत आले नाही. आज सकाळी मुलाने उसाच्या शेतात शोध घेतला असता एका झाडाला बाबुराव यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सून, जावई असा परिवार आहे. पाऊस नसल्याने यंदा उत्पन्न दिसत नाही, त्यात थकलेले कर्ज कसे फेडणार या चिंतेत ते मागील काही दिवसांपासून होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्यातील पोह. गजानन पिंपळपल्ले, पोना. सुरेश वाघ यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेहाचे पाथरी ग्रामीण रुग्णालय मध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे.